स्वातंत्र्य का नासले?

शरद जोशी
देशातील बहुजन समाजाचा कोणी ना त्राता,  ना नेता. जातिव्यवस्थेच्या चक्रात पिढ्यान् पिढ्या भरडला गेलेला हा समाज इंग्रजी सत्तेच्या काळात आपली गुलामगिरी संपेल आणि थोडे बरे दिवस येतील, बहुजन समाजाला विद्या मिळाली तर इंग्रजी अमलात ते सुखी होतील, अशा आशेत होता. 1857 च्या बंडानंतर राणीच्या जाहीरनाम्यात परंपरागत जातिव्यवस्थेच्या उतरंडीस जीवदान मिळाले. भटशाही इंग्रजी राज्याचे महत्त्वाचे अंग मिळाले. शेतीवरील कर आणि इंग्रजी व्यापारामुळे उद्ध्वस्त होणारे गावोगावचे बलुतेदार त्यांना वाली कोणीच राहिला नाही. या समाजाची राजकीय भूमिका काय होती?
 
शरद जोशी
गांधीजी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा झाला हे खरे. परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात दुसरे काही प्रवाहच नव्हते आणि सर्व जातींचे यच्चयावत समाज गांधीप्रणीत काँग्रेसच्या झेंड्याखाली लढ्यात ठाकले होते, असे म्हणण्यास काही ऐतिहासिक आधार नाही. पारतंत्र्य, गुलामी ही लाजिरवाणी, अपमानास्पद गोष्ट आहे; आपल्या देशावर लांबून आलेल्या परकीयांचे राज्य असावे ही काही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही; राजकीय दास्यामुळे देशाचे आर्थिक शोषण होत आहे आणि देश कंगाल बनत चालला आहे.
 
शरद जोशी
दिल्लीची आजची अवस्था औरंजेबाच्या मृत्यूनंतरच्या दिल्लीच्या सत्तेसारखी झाली आहे. कोण शाहजादा येतो आणि स्वख्तबर बसतो याला काही महत्त्व राहिले नाही. तख्तावर कोणी देवेगौडा बसला तर त्याला युगपुरुष संबोधून जयो स्तुते करणाऱ्या भाटांनी दरबार भरून गेले आहेत.
 
शरद जोशी
स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली, समित्या नेमल्या गेल्या आणि खुद्द सत्तेच्या खुर्च्यांवर विराजमान झालेलेही स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याबद्दल गोंधळलेल्या व्दिधा मन:स्थितीत होते. पन्नास वर्षे झाली, प्रसंग साजरा करायला.  पण नेमके काय करायचे हे कुणीच सांगू शकत नव्हते. आनंद साजरा करणे हा महोत्सवाचा एक हेतू, पण त्याचबरोबर पन्नास वर्षांच्या या स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय मिळवले यापेक्षा भारताची पीछेहाट का झाली, स्वप्ने अपुरी का राहिली याचा विचार अंतर्मुख होऊन करण्याची आवश्यकता आहे. असा सगळ्यांचा सूर होता.
 
शरद जोशी
इंग्रजांचे राज्य संपल्याला आता पन्नास वर्षे झाली. नियतीला दिलेल्या वचनाची गोष्ट दूरच राहिली, सर्व जगात सर्वोच्च स्थानी आरूढ होण्याची स्वप्ने कधी साकारणे शक्यच नव्हते, उलट गरिबीचा प्रश्न सुटला नाही, निरक्षरांची संख्या वाढली, महागाई, बेकारी यांनी थैमान घातले. नोकरशाही, काळाबाजार करणारे, तस्कर, गुन्हेगार यांचा अंमल चालू झाला. गुंड नेत्यांना हाती धरू लागले आणि  नंतर नेत्यांना दूर करून स्वत:च राजकारणाच्या आखाड्यात उतरले.
 
शरद जोशी
भारतातील इंग्रजी राज्य अधिकृतरीत्या 15 ऑगस्ट 1947 रोजी संपुष्टात आले. आता पन्नास वर्षे झाली. भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून ते देशभर साजरे केले जात आहे. दीड शतकाच्या राजकीय दास्यानंतर भारतात स्वातंत्र्याची पहाट उगवली आणि शेकडो वर्षांच्या महानिद्रेतून देश जागा झाला. आपल्या नियतीचा अधिकारी बनला. सगळा देश दारिद्र्य, भूकमार, रोगराई, निरक्षरता, अडाणीपणा, धर्मभेद, जातिवाद, यांनी ग्रासून टाकलेला. परकीयांच्या हातातील सत्ता स्वकीयांच्या हाती आली, आता शतकानुशतकांच्या या समस्या सहज दूर होतील, अशी सर्व भारतीयांची भावना होती.
 
शरद जोशी
स्वातंत्र्यानंतर काय होईल, याची सारी रम्य स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. देशाचा अधःपात अजूनही चालूच आहे. यावेळी सर्व अहंकार, पक्ष, व्यक्तिपूजा सोडून 'चुकले काय?' आणि 'यापुढे कोणता मार्ग धरावा?' याचा विचार कोणास महत्त्वाचा वाटत नाही. नवीन पिढीत कोणा तरुणाच्या मनात भगतसिंग, बाबू गेनू, सुभाषचंद्र बोस यांच्या मनातील चेतना जागृत झाली तर त्या वातीस थोडा आधार मिळावा यासाठी 'स्वातंत्र्य का नासले?' या लेखमालेचा तेल म्हणून तरी उपयोग व्हावा, एवढीच अपेक्षा....