टॉप न्यूज

ब्युरो रिपोर्ट, माहूर, (जि. नांदेड)
मऱ्हाटी मुलखातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता. अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. माहूरगडावर देवीचं मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजानं बांधलं. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील भाविकांनी माहूरगड फुलून गेलेला असतो.
 
ब्युरो रिपोर्ट, नाशिक
नाशिकजवळील वणीची देवी म्हणजे सप्तश्रृंगी माता हे राज्यातील साडेतीन पीठांपैकी एक अर्धपीठ. भूतलावर श्री. जगदंबेची ५१ शक्तीपीठं आहेत. या शक्तीपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचं त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपिणी धर्मपीठ ओंकार स्वरुप आधिष्ठीत असून ते म्हणज़े सप्तश्रृंगी देवी होय. महिषासुराचा वध करुन आदिमाया पार्वती विश्रांतीसाठी या सप्तश्रृंगी गडावर आली. सह्याद्रीच्या सातमाळेच्या पर्वतरांगेमुळं या तीर्थस्थानाला भव्यदिव्यता प्राप्त झालीय. त्यामुळंच देदिप्यमान सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेताना अंत:करणही विशाल होऊन जातं.
 
ब्युरो रिपोर्ट, तुळजापूर
देवीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेली तुळजापूरची आई भवानी ही तर मऱ्हाटी मुलखाची कुलस्वामीनी! छत्रपती शिवरायांची ही कुलदेवता, शौर्य, शक्ती प्रदान करणारी माता आहे. जगदंबेचा उदो...उदो केला की मर्दुमकी गाजवण्यासाठी अंगात बळ येतं. त्यामुळं नवरात्रात भवानीमातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तुळजापूर देशभरातील भाविकांनी गजबजून गेलंय.
 
ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
पुराणात उल्लेखलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी हे या पीठांपैकी एक! या आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रीत होणारा जागर कोण वर्णवा! तो पाहण्यासाठी आणि अंबामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी देशभरातील भाविकांची पावले करवीरनगरीत वळतायत. नवरात्रीत देशभरांतून सुमारे 12 लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज आहे. अंबाबाईमुळंच कोल्हापूरची नवरात्र आणि शाही दसरा आज जगभरात आकर्षणाचा विषय झालाय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ झालाय. घराघरात घट स्थापन झालेत. आता इथून पुढचे नऊ दिवस आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे... आपल्या कृषिप्रधान देशातील बहुतांश चालीरीती शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित आहेत. नवरात्रोत्सव हा सणही त्यापैकीच एक! ही पूजा शक्तिदेवीची. शारदीय सुखसोहळ्यांची. घरात निसर्ग फुलवण्याची...निसर्ग रसरसून अनुभवण्याची!!!
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दहा दिवस मोरयाचा गजर आसमंतात भरुन राहिलाय. आता, आजचा दिवस आहे बाप्पांना निरोप देण्याचा. मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका जल्लोषात सुरू झाल्यात. 'मोरया रे, बाप्पा मोरया रे' अशा गजरात 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी विनवणी कार्यकर्ते बाप्पाला करतायत. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांनीही 'कडक' तयारी केलीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
आली, आली गौराई, सोन्या-रुप्याच्या पावलानं... आली, आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... बाप्पांनंतर घरोघरी वाजतगाजत गौराई आली अन् अवघा मराठी मुलूख चैतन्य, आनंदानं न्हाऊन गेला. सुख, समाधान, शांती, आनंद घेऊन आलेल्या ज्येष्ठा, कनिष्ठा या माहेरवाशीणींना गोडाधोडाचा नैवेद्य करून, गाणी गाऊन त्यांची आळवणी केल्यानंतर आता त्यांना निरोप द्यायची वेळ आल्यानं सर्वांनाच हुरहूर लागून राहिलीय.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या गणपती बाप्पांचं आज जल्लोषात आगमन झालं. घरोघरी यथासांग बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपतीही नेहमीप्रमाणं मोठ्या थाटामाटात मिरवणुकीनं आले.  बाप्पा आल्यानं अबालवृद्धांना आनंद झाला असून 'आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे' असं चित्र पहायला मिळतंय. पहिल्याच दिवशी बाप्पांचे मोदक खाऊन सर्वांचीच तोंडं गोड झालीत. आता इथूनपुढचे दहा दिवस मोरयाचा गजर आसमंतात भरून राहणार असून हीsss धमाल असणारंय.
 
ब्युरो रिपोर्ट
कास्तकऱ्याएवढाच शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. दसरा दिवळीसारखाच शेतकरी बैलपोळ्याचा सण साजरा करतात. बैलांना आंघोळ घालून, सजवूनधजवून गोडधोड खाऊ घालून त्यांची मिरवणूक काढतात. यांत्रिकीकरणामुळं बैलांची शेतातील कामं कमी झाल्यानं दावणीला त्यांची संख्या घटलीय खरी, पण त्यांचं महत्त्व काही कमी झालेलं नाही. 'एक नमन गवरा, पारबती हर बोला' असा गजर करीत आज म्हणजेच पोळ्याला त्यांचं धुमधडाक्यात कौडकौतुक होतं. 
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई/रत्नागिरी
 गणेशोत्सव आता उंबरठ्य़ावर आला असून बाप्पांच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या स्टॉल्सनी राज्यभरातील बाजारपेठा फुलून गेल्यात. महागाईची झळ बाप्पांनाही बसली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत  किमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढल्यात. त्यामुळं महागाईमोलाचा बाप्पा घरी नेताना भाविकांच्या खिशाला चाट बसणार आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, माती, रंग, मजुरी असे सर्वांचेच भाव वाढल्यानं भाववाढ अटळ होती, असं मूर्तीकार सांगतायत. त्यामुळं एकुणच गणेशोत्सवावर महागाईचं सावट असेल, हे आता स्पष्ट झालंय. पण, बाप्पा श्रद्धेचा विषय असल्यानं त्यांचं आगमन नेहमीप्रमाणं धडाक्यात होईल, एवढं नक्की!