भारतातील आधुनिक कवितेचे जनक म्हणून ख्याती लाभलेले केशवसुत मालगुंडचे. निसर्गरम्य कोकणाला नररत्नांची खाण म्हणून ओळखलं जातं. केशवसुत त्यापैकीच एक. केशवसुतांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंडला झाला. केशवसुतांच्या जन्मघराचं रूपडं आता स्मारकात पालटलंय. ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला ती खोलीही इथं पाहायला मिळते. त्यांच्या काळातल्या वस्तूही इथं आहेत. त्यात लामणदिवा, माचा, झोपाळा, समईची वात कापण्याची कात्री, पोथी स्टॅण्ड, घंगाळ आदी वस्तू आहेत. सांजरातीला आजही हे घर विजेच्या नव्हे, तर तेलाच्या दिव्यांनी उजळतं. त्यामुळंच या स्मारकाला भेट दिल्यानंतर दीडशे वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो. केशवसुतांच्या कविता या घराच्या मागे शिल्पावर कोरलेल्या पाहायला मिळतात. इथं येणारा साहित्यप्रेमी ही खोली पाहून अक्षरश: भारावून जातो. पर्यटकांचा राबता वाढत असल्यानं मालगुंडला साहित्याची पंढरी म्हटलं जातंय.
केशवसुतांच्या या स्मारक बांधणीला २०व्या शतकातच शेवटचं दशक उजाडावं लागलं. १९९० मध्ये रत्नागिरीत झालेल्या 64व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी आपण इथं स्मारक उभारणार असं जाहीर करून टाकलं. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. त्यानंतर लगेचच कोमसापच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांना स्मारकाचा प्रस्ताव सादर केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ८ मे १९९४ रोजी कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन झालं.
या स्मारकाची कीर्ती सर्वदूर पसरली असून आतापर्यंत अनेक मान्यवरांनी इथं भेटी दिल्यात. त्यात कविवर्य नारायण सुर्वे, माधव गडकरी, ना. धों. मनोहर, विजया राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ, कवी ग्रेस, मारुती चित्तमपल्ली, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम, शांताबाई शेळके, वसंत बापट आदींचा समावेश आहे. या स्मारकामुळं निसर्गरम्य मालगुंडच्या वैभवात भर पडलीय, एवढं खरं.
अध्यात्मात अडकून पडलेल्या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणलं. चाकोरीबद्ध कवितेला मुक्त रूप दिलं. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली.
काव्यविषयक दृष्टिकोन, कवितेचा आशय, तिचा आविष्कार या सार्याच बाबतीत क्रांती घडवणार्या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूनं गाठलं. हे मराठी साहित्याचं आणि महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल.
Comments
- No comments found