स्पेशल रिपोर्ट

मुश्ताक खान, आंगणेवाडी, मालवण
जत्रा म्हटली की आकाशपाळणे, लाकडाच्या तसंच प्लॅस्टिकच्या खेळण्यांचे स्टॉल, चिक्की आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची रेलचल. त्यातही जत्रांमध्ये स्थानिक प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेत मिळणारा खाजा हा त्यापैकीच एक. भराडीआईचं दर्शन घेऊन परतताना प्रसाद म्हणून खाजा गाठीशी बांधूनच भाविक घरी परततो. कारण त्याशिवाय यात्राच पूर्ण होत नाही. साहजिकच दर्शनाला जितकी गर्दी झाली होती तितकीच गर्दी मालवणी खाजा खरेदीसाठी झाली होती. तीन दिवसांच्या जत्रेत केवळ खाजाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालीय.
 
विवेक राजूरकर, अंबड, जालना
"काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील 'युज एण्ड थ्रो' संस्कृतीत तिचं अस्तित्वच संपुष्टात येताना दिसतंय. शिवाय या व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं घोंगडी बनवणारे हात आता दुसऱ्या उद्योगधंद्याकडं वळताहेत. त्यामुळं संतपरंपरेपासून चालत आलेली ही घोंगडी काही वर्षांनंतर दिसेनाशी होईल की काय, अशी शक्यता निर्माण झालीय.
 
यशवंत यादव, सोलापूर
मांडवावर बहरलेली ही आहे डाळिंबाची बाग. द्राक्ष बाग काढून टाकल्यानंतर मांडवावर द्राक्षांप्रमाणं डाळिंबाचं उत्पादन घेण्याचा जगातला पहिलाच अभिनव प्रयोग राजीव माने यांनी यशस्वी केलाय. प्रचलित पद्धतीत एकरी 300 रोपांची लागवड केली जाते, पण या महाशयानं पाचपट म्हणजे 1500 रोपांची लागवड करून भरघोस उत्पन्न देणारी डाळिंबाची बाग उभी केलीय. विशेष म्हणजे, ही बाग त्यांनी सेंद्रीय पध्दतीनं फुलवलीय.
 
प्रवीण मनोहर, अमरावती
अमरावती - मेळघाटात रोजगाराच्या योजना सुरू आहेत. परंतु आदिवासींना पुरेसा रोजगार देण्यात त्या अपयशी ठरल्यात. दररोज आणि पुरेशी मजुरी न मिळणं, कामं मिळण्यात येणाऱ्या अडचणी, सरकारी अधिकाऱ्यांकडून कामं देण्यात होणारा पक्षपात, आदींमुळं जास्त मजुरी देणाऱ्या शेतीच्या कामाकडं हा आदिवासी वळू लागलाय. इथं रोजच्या रोज मिळणाऱ्या पैशांमुळं आदिवासी सरकारी कामावर थांबण्यापेक्षा मजुरीच्या शोधात शहराकडं स्थलांतर करू लागलाय. त्याला रोखण्यासाठी गरज आहे ती सकारात्मक धोरणाची.
 
ब्युरो रिपोर्ट, भंडारा
विदर्भातील भंडारा जिल्हात धान शेती मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, निसर्गावर अवलंबून असणारी ही शेती बेभरवशाचीच आहे. त्यासाठी जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन हा चांगला पर्याय आहे. साकोली तालुक्यातील बोधरा येथील दिलीप कापगते या तरुण शेतकऱ्यानं कॉलेजला असतानाच एक कालवड घेऊन दुग्धोत्पादनाचा श्रीगणेशा केला. 12 वर्षांनंतर आज त्याच्या आधुनिक गोठ्यात 13 गाई आणि 9 वासरं आहेत. यातून महिन्याला सरासरी 40 हजारांचं उत्पादनही मिळतं.  
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
कोकणात काकडी, मिर्ची, काजू, तांदूळ या नेहमीच्या प्रचलित पिकांऐवजी लाडघरच्या प्रसाद बाळ यांनी नावीन्याचा ध्यास घेत तब्बल अडीच एकरावर भोपळ्याचं पीक घेऊन भरघोस उत्पन्न मिळवलंय. त्यामुळं आजीबाईंचा टुणूक टुणूक चालणारा भोपळा कोकणच्या लाल मातीतही रुजतो, हे स्पष्ट झालंय. नजीकच्या काळात कोकणात भोपळ्याची लागवड वाढेल, असा विश्वासही त्यांना वाटतोय. हा आदर्श घेऊन कोकणातल्या इतर शेतकऱ्यांनी जर भोपळ्याची लागवड केली, तर त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा पक्का निर्धार बाळ यांनी केलाय.
 
मुश्ताक खान, रत्नागिरी
डिझेल दरवाढ तातडीनं मागं घ्यावी, यासाठी मच्छीमारांचं मासेमारी बंद आंदोलन सुरू आहे. मात्र,  सरकारवर काहीच फरक पडत नसल्यानं त्यांनी नाईलाजानं आपल्या होड्या दर्यात लोटल्यात. पण त्याचबरोबर सरकारनं लवकर योग्य निर्णय घेतला नाही तर या सरकारला आम्ही बुडवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही मच्छीमारांनी केलाय.
 
शशिकांत कोरे, सातारा
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ इथल्या महेश कदम या युवा शेतकऱ्यानं बाजारपेठेचा अभ्यास करून व्यावसायिक शेती करण्याचा निर्धार केला. सुरुवातीलाच हटके दुधी भोपळा केला. आकारानं एकसारखं दिसणारं आणि हमखास दर देणारं दिव्या जातीचं वाण निवडलं. 20 गुंठे जमिनीत 5 टन भोपळा पिकवला आणि बक्कळ पैसा कमावला.
 
मुश्ताक खान, दापोली
कोकणाला निसर्गसौंदर्याचं माहेरघर म्हटलं जातं. इथले विशाल समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडं, नागमोडी रस्ते पर्यटकांना आकर्षित करत आलेत. यातच आता भर पडलीय ती दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं उभारलेल्या सोलर पार्कची. हे पार्क म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा उद्यान आज सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. इथं येणारे पर्यटक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण झालंय.
 
मुश्ताक खान, दापोली
दापोलीला कृषी विद्यापीठ झाल्यापासून कोकणातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पीक पद्धती बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यातूनच भात, हापूस, फणस, काजू या पारंपरिक पिकांबरोबरच कोकणात चक्क स्ट्रॉबेरी पिकू लागलीय. देगावच्या एका तरुण शेतकऱ्यानं सेंद्रीय पद्धतीनं शेती करून चक्क कलिंगडं पिकवलीत. जोडीला वांगी आणि कोल्हापुरी मिरचीही आहे. मग, बोला... कोकणातलो शेतकरी आता बदलूक लागलो मा!