स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, वाशीम
कापूस आणि धान ही विदर्भातील शेतकऱ्यांची पारंपरिक पिकं. परंतु, इथला शेतकरी आता नवनवीन तंत्र आत्मसात करून पीक पद्धतीत बदल करू पाहतोय. त्यातूनच कपाशीच्या या मुलखात उसानंतर आता द्राक्षांचे मळे फुलू लागलेत. वाशीम जिल्ह्यातल्या अनसिंग गावच्या एका निवृत्त डॉक्टरनं उजाड माळरानावर द्राक्षांची यशस्वी लागवड होऊ शकते, हे सिद्ध केलंय. त्यांची ही द्राक्षशेती पाहण्यासाठी विदर्भातील शेतकरी गर्दी करू लागलेत.  
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
सरकारी योजनांचा लाभ निव्वळ अनुदानाकरता न घेता आर्थिक परस्थिती सुधारण्याकरता घेता येतो हे अरुण बळी या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव इथल्या या शेतकऱ्यानं ही प्रगती बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून साधलीय. त्यांनी बायोगॅस प्रकल्पाचा वापर करत पूरक जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला. इंधन बचतीमुळं त्यांची दररोज २ हजार रुपयांची बचत होत आहे. आणि निव्वळ खर्चवजा जाता त्यांना २ लाख ५० हजारचा निव्वळ नफा झालाय.
 
अविनाश पवार, पुणे
चारा खा... पाणी पी... अन् भुर्रर्र उडून जा... अंगणात रांगणाऱ्या बाळासाठी आई अशी चिमण्यांची कित्ती आर्जवं करायची. आता काळ बदलला. माणसांची नियत बदलली. झाडं तुटली. पाखरं दिसेनाशी झाली. अशा काळात 'या चिमण्यांनो परत फिरा...' अशी जिव्हाळ्याची साद घालतोय पुण्याजवळच्या निमसाखर गावातला एक शेतकरी. विश्वास बसणार नाही, पण या शेतकऱ्यानं पाखरांसाठी दुष्काळी परिस्थितीतही भरात आलेलं आपलं ज्वारीचं शेतच राखून ठेवलंय.
 
प्रदिप भणगे, डोंबिवली
फुलांचा राजा कोण? हा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाला आठवतं ते गुलाबाचं फूल. एकाच ठिकाणी जर हीच गुलाबाची विविधरंगी फुलं पाहायला मिळाली तर... एकदा डोंबिवलीत अशाच गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होत. त्यात तब्बल ४०० प्रकारच्या गुलाबांची फुलं होती. आजच्या 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त या होऊन गेलेल्या प्रदर्शनातून फेरफटका मारुया!
 
मुश्ताक खान, सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले विजयदुर्गची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. किल्ल्यातले बुरुज ढासळले आहेत, तर तटबंद्याही कोसळल्या आहेत. एवढंच नाही तर शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या तोफा आणि हातगोळे उघड्यावर टाकण्यात आले आहेत. या ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था बघून हळहळ व्यक्त होतेय. पण सरकारला त्याचं काहीही सोयरसुतक नाही हे आणखी गंभीर.
 
प्रवीण मनोहर, अमरावती
बाई मी धरण, धरण बांधते...माझं मरण कांडते, या कवितेच्या ओळी किती सार्थ आहेत, याचा प्रत्यय आजही पदोपदी येतो. अगदी जुन्या कोयनेच्या धरणापासून ते अलीकडच्या तारळी धरणापासून प्रकल्पबाधित झालेल्यांचे प्रश्न कायम आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीमधून अगदी मेळघाट परिसरही सुटलेला नाही.मल्हारी गावातील सुरेश बोरेकर या तरुण शेतकऱ्यानं नुकतंच आत्मदहन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्यानं हा प्रश्न पुन्हा विदर्भात ऐरणीवर आलाय.
 
ब्युरो रिपोर्ट, वाशीम
विदर्भामध्ये नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांचं चित्र दिसत असलं, तरी या चित्राला दुसरीही चांगली बाजू आहे हे इथल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी या परिस्थितीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करून आपल्या शेतीतून चांगलं उत्पन्न घेत आहेत. वाशीम जिल्ह्यातील डोंगर किन्ही गावच्या डॉ. हेमंत देशमुख यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाला रामराम करत लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलंय.
 
यशवंत यादव, सोलापूर
आईवडिलांच्या मायेचा ओलावा, मार्गदर्शन जर शाळेतही मिळू लागलं तर कुठलं मूल शाळेत जाताना नको रे बाबा शाळा...असं म्हणेल? सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील प्राथमिक शाळेत हाच प्रेमाचा गोडवा तिथल्या शिक्षकांनी दिलाय. म्हणूनच या मुलांना शाळा आणि घर याच्यात फरक वाटत नाही. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना योग्य मूल्यशिक्षण दिल्यामुळं त्याचं फळ या मुलांच्या बोलण्यातून जाणवतं. महत्त्वाचं म्हणजे, या शाळेतील सर्व शिक्षक महिला आहेत.
 
विवेक राजूरकर, चापानेर, औरंगाबाद
"गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?” हा प्रश्न विचारलाय सहावीत शिकणाऱ्या मयुरी पवार या चिमुरडीनं.  दारूबंदीसाठी इथल्या महिलांनी सुरू केलेल्या लढ्यात ही चिमुरडीही हिरिरीनं उतरलीय. हे चित्र फक्त तिच्या घरातलं नाहीये, तर चापानेर गावातील प्रत्येक घरात, तसंच कन्नड तालुक्यातील अनेक गावांत पाहायला मिळतंय. दारूबंदीसाठी इथल्या महिलांनी पुकारलेला हा लढा दारूबंदी होईपर्यंत सुरूच राहणार आहे.
 
मुश्ताक खान, दापोली
स्ट्रॉबेरी कुठं होते, हा प्रश्न जर कुणाला विचारला तर आपसूकच उत्तर एकच महाबळेश्वरमध्ये. पण महाबळेश्वरची मक्तेदारी मोडीत काढत दापोलीही स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी सज्ज झालीय. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ही किमया साधली असून शेतकऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलंय. दापोली हे कोकणातलं महाबळेश्वर आहे, यावर यामुळं शिक्कामोर्तब झालंय.