कुठंही गेलं की खांबेकरांची टेप सुरू होते ती...
"आला दुष्काळ पाहुणा,
ठेप ठेवूयाची काही,
थेंब थेंब साठवूनी,
या करू सरबराई "
या गाण्यानं.
महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचं गंभीर सावट पडलंय. पाणी टंचाईमुळं लोकांचे हाल होतायत, पाण्याअभावी कित्येकांवर स्थलांतराची वेळ आलीय. गावांमधूनच नव्हे तर शहरामध्येही दोन-चार दिवसाआड पाणी सोडण्यात येतंय. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत तर तिपटीनं वाढ झालीय. आज सरकारी पातळीवरून तसंच अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमांतून पाण्याचा जागर होतोय. 'भारत4इंडिया'नं तर अगदी सुरवातीपासूनच 'जागर पाण्याचा' सुरू केलाय. त्यात खांबेकरांसारखी माणसंही आघाडीवर आहेत.
…आणि आयुष्याला मिळाली कलाटणी
औरंगपुरा भागातील राधा-मोहन म्युझिक सेंटर हे जुन्याजाणत्या संगीताची आवड असणाऱ्या दर्दी रसिकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे मालक श्याम खांबेकर हे मूळचे वैजापूरचे. १९७२ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात वैजापूर-येवला भागातील लोकांची पाण्यासाठी होणारी तगमग त्यांनी पाहिलीय. दुष्काळाची दाहकता अनुभवलीय. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळं त्यांच्या आईला पायपीट करून लांब पल्ल्यावरून पाणी आणावं लागे. या त्रासामुळं आईला आतड्याचा कॅन्सर झाला. ही बाब खांबेकरांच्या आयुष्यालाच कलाटणी देणारी ठरली. तेव्हापासून त्यांनी संपूर्ण आयुष्य पाणी बचत करण्याचं व्रत अंगीकारलं आणि ते आजतागायत सुरूच आहे.
जनजागृतीचं आगळी कल्पना
पाणी बचत आणि जनजागृती करण्यासाठी खांबेकर यांनी आगळीवेगळी शक्कल लढवलीय. यासाठी त्यांनी पाणी बचतीच्या संदर्भातील कविता आपल्या पांढऱ्याशुभ्र शर्टवर छापून घेतल्या आहेत. पाण्याचा तुटवडा असताना आजही अनेक लोकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अशा लोकांचं मन परिवर्तन व्हावं यासाठी त्यांनी ही शक्कल लढवलीय. आज ते याद्वारे चालता चालता हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. मग तो औरंगाबाद परिसरातील सिग्नल असो, दुकान परिसर, विविध वसाहती, लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, बाजारपेठ असो. आपसूकच सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. अनेक जण त्यांच्या शर्टवरील कविता निरखून पाहतात, तर अनेक जण या कविता तिथल्या तिथं लिहून घेतात. त्यांच्या या कामाची आज प्रशंसा होतेय. अनेकदा भर बाजारातही खांबेकर सरांचा पाणी बचतीचा तास सुरू होतो. पाण्याचं महत्त्व जाणा, पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येकानं जपून वापर केला पाहिजे, असा प्रचार आणि प्रसार ते करत असतात.
पाणी प्रश्नावर मोफत व्याख्यानं
पाणी बचतीच्या जागृतीसाठी त्यांच्या कवितांच्या ध्वनिमुद्रिका (सी.डी) त्यांनी काढल्या आहेत. ते या सीडीचं वाटप करतात. याशिवाय त्यांनी या विषयावरील अनेक पुस्तकंही प्रकाशित केलीत. आज खांबेकर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वखर्चानं प्रवास करून पाणी प्रश्नावर मोफत व्याख्यानं देतात ते कोणतंही मानधन न घेता.
सृष्टी को बचाना होगा...
महाराष्ट्राबाहेर जाताना खांबेकर हिंदी कविता छापलेला शर्ट घालून जातात. 'सृष्टी को बचाना होगा...' हा संदेश त्यांनी परराज्यातही पोहोचवला आहे. आकाशवाणीवरही पाणी बचतीवरील त्यांच्या कविता संदेश देत आहेत.
'तहानलेल्या जनांची विनवणी ही ऐका हो,
थेंब थेंब साठवा हो, थेंब थेंब वाचवा हो...'
त्यांची ही कविता आज प्रत्येकाला अंतर्मुख करतेय. आपल्या सर्वांना आता अंतर्मुख होण्याची वेळ आलीय, असं ते म्हणतात. पाण्याचा एकेक थेंब वाचवण्याचा कानमंत्र वैद्य आजोबांनी त्यांना लहानपणीच दिलाय. आजोबांच्या सहवासातील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर (तात्या), मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे संस्कार लहानपणीच खांबेकर यांच्यावर झालेत, तीच त्यांच्या कवितांमागील प्रेरणा असावी.
पाण्याचा थेंब थेंब साठवण्याचा संदेश
"आला दुष्काळ पाहुणा,
ठेप ठेवूयाची काही,
थेंब थेंब साठवूनी,
या करू सरबराई"
महाराष्ट्रात पाहुणा म्हणून आलेल्या दुष्काळाची दखल घेत पाण्याचा एकेक थेंब साठवून त्याची सरबराई करू या, असा संदेश आपल्या कवितांतून देत... निसर्ग हा चहुअंगानं मानवास भरभरून देत असतो, मात्र आम्ही अविचारानं त्याची नासाडीच करतो. आता निसर्ग कोपण्याच्या उंबरठ्यावर आलाय. पाणी हा सृष्टीचा महत्त्वाचा घटक आहे, जगात पाणी नसल्यास काहीच शिल्लक राहणार नाही. पृथ्वीचं अस्तित्व राखण्यासाठी डोळ्यांत तेल घालून पाणी जपलं पाहिजे. पेरल्याशिवाय उगवत नाही, हे सूत्र माहीत असताना तुम्ही जर पेरलंच नाही तर उगवेल कसं? निसर्गाचं पर्यावरण जाणून घ्या, थोडं गीतातून समजून घ्या. असं आर्जवच आज श्याम खांबेकर सर्वांना करताहेत.
Comments
- No comments found