स्पेशल रिपोर्ट

पाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
'राम राम पाव्हणं, शौचालय बांधलं का?...नाही..? तर मग.... मागे फीर'.  पाटोदा गावाच्या प्रवेशद्वारावरील ही अभिनव पाटीच गावाची वेगळी ओळख सांगून जाते. या गावातील मुलींना सून करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी असलेली ही तंबीच. सर्वांना शुद्ध पाणी, सांडपाणी, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन, तंटामुक्त, हागणदारीमुक्त अशा अनेक गोष्टींमुळं हिरवाईनं नटलेलं पाटोदा राज्यात आदर्श गावाचं मॉडेल म्हणून पुढं येताना पाहायला मिळतंय.  त्यामुळंच या गावात सून म्हणून येणं म्हणजे आज भाग्याचं लक्षण समजलं जातं.
 


औरंगाबादपासून केवळ १५ किलोमीटर अंतरावर पाटोदा वसलंय. ग्रामपंचायतीची स्वयंशिस्त, चोख वसुली आणि योग्य आर्थिक नियोजन, पाण्याचं आणि कचऱ्याचं व्यवस्थापन, यामुळं हे गाव आदर्श झालंय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ ग्रामपंचायतच नव्हे तर इथला प्रत्येक ग्रामस्थ गावाच्या व्यवस्थेबाबत दक्ष आहे. गावकऱ्यांनी मोठ्या जिद्दीनं गावाचं संपूर्ण रूपच पालटून टाकलं. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात निर्मल ग्राम पुरस्कार मिळवणारं, तंटामुक्ती अभियानात आघाडीवर असणारं हे गाव आता चांगलंच चर्चेत आलंय, त्याला कारण ठरलाय दुष्काळ. आजमितीला मराठवाड्यातील बहुतांशी गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत असताना पाटोदावासीय मात्र मजेत आहेत. इथल्या घराघरातील, तसंच सार्वजनिक नळांना भरभरून पाणी येतं. गावाचा परिसर हिरवाईनं नटलाय. थोडक्यात, इथं दुष्काळाचा मागमूसही दिसत नाही.


patoda 1२४ तास पाणीपुरवठा करणारं गाव
जिल्ह्यात सर्वत्रच पाण्याची टंचाई आहे. दररोज सातशेवर टँकरच्या फेऱ्या होतायत. उन्हाळा तीव्र झाल्यावर टँकर भरायला तरी पाणी कुठून आणायचं, अशी बिकट परिस्थिती आहे. परंतु पाटोदावासीय मात्र निश्चिंत आहेत. जायकवाडी धरणातून वाळूज औद्योगिक परिसराला पाणी देणाऱ्या जलवाहिनीतून या गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पाण्याचं महत्त्व ओळखून ग्रामपंचायतीनं पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलंय. पिण्यासाठी आणि सांडपाण्यासाठी वेगळी अशी व्यवस्था गावात आहे. ग्रामपंचायतीनं नळाला मीटर बसवलेत, आणि एक पैसा प्रती लिटरप्रमाणं पाणीपट्टी वसूल केली जाते. यामुळं गावकऱ्यांना पाण्याचं मोल कळू लागलंय. सांडपाण्यावर प्रकिया करणारा प्लाण्ट उभारलाय. त्यामुळं दैंनदिन वापरासाठीच्या पाण्याचंही संकट टळलंय. ज्यांना नळ घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही त्यांच्यासाठी गावात एक पिण्याच्या पाण्याची टाकी तयार केली गेलीय. तसंच गावात प्रत्येक घरात शौचालय आहे. ज्यांची शौचालय बांधण्याची ऐपत नाही अशांसाठी सार्वजनिक शौचालयं आहेत. तीन कुटुंबांना मिळून एक शौचालय देण्यात आलं असून त्यांच्याकडून अगदी घरच्या शौचालयासारखी त्याची देखभाल केली जाते.

 

करदात्यांना वर्षभर दळण मोफत
पाटोद्यात तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावरही मोटरशिवाय पाणी चढतं. पाण्याची सेवा देतानाच वसुलीही चोख ठेवली जाते. पिण्याचे पाणी प्रती लिटर एक पैसा तर वापराच्या पाण्यासाठी प्रती कुटुंब ६०० रुपये आकारले जातात. दरवर्षी ४ लाख ५० हजार पाणीपट्टीची वसुली होते. एमआयडीसीचं बिल दर महिना सुमारे १६ हजार रुपये एवढं येतं. पाणी गळतीचं प्रमाण शून्य आहे. गावात १०० टक्के कर भरला जातो. करदात्यास ग्रामपंचायतीकडून वर्षभर मोफत दळण दळून दिलं जातं. शेतीचा फेरफार, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यूचा दाखला आदी गोष्टींसाठी ग्रामपंचायत कोणतंही शुल्क आकारत नाही. करवसुलीसाठी अशी सवलत देणारं पाटोदा हे राज्यात एकमेव गाव आहे.

 

स्वच्छतेसाठी झटणारं गाव
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये गावास राष्ट्रपतींकडून एकदा नव्हे तर दोनदा निर्मलग्राम पुरस्कार मिळालाय. या अभियानाचे अध्यक्ष आणि माजी सरपंच भास्कर पेरे यांच्या प्रेरणेतूनच या गावानं आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. दृष्ट लागावी अशी स्वच्छता गावात असते. प्रत्येक घरापुढं एक झाड, घरामागं परसबागा, मुलांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात यासाठी ठिकठिकाणी वॉश बेसिन, गावात सगळीकडं हिरवळ आणि स्वच्छ रस्ते, असं प्रसन्न दृश्य इथं आहे. ग्रामपंचायतीनं कचऱ्यासाठी प्रत्येक घरात दोन बकेट दिलीत. गावकऱ्यांकडून एकात ओला, तर दुसऱ्यात सुका कचरा साठवला जातो. याशिवाय कापडी पिशवी देण्यात आली असून त्यात प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू साठवल्या जातात. त्यामुळं कचरा ट्रॅक्टरमध्ये उचलतानाच त्याचं व्यवस्थापन होतं. दररोज सकाळी घंटागाडी कचरा गोळा करते. गावात कचऱ्यापासूनचं गांडूळ खत निर्मितीचा, तसंच गोबरगॅसचे अनेक प्रकल्प यशस्वीपणं राबवले गेलेत. गावाच्या चार कोपऱ्यात धोबीघाट बांधलेत. गावाचं शिवार १०० टक्के बागायती आहे. गावात पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं जातं. ग्रामपंचायतीनं आतापर्यंत साडेतीन हजारांवर झाडांचं वाटप केलं असून ती झाडं ग्रामस्थांनी जीवाचं रान करून जगवलीत. गावात आंबा, चिंच, बदाम, पेरू, डाळिंब, नारळ अशा फळझाडांची नुसती रेलचेल आहे.

 


patoda 14आर्थिकदृष्ट्या समृद्ध
पाटोदा ग्रामपंचायतीनं हिशेब सुरुवातीपासूनचं एकदम चोख ठेवलाय. याशिवाय उत्पन्न वाढवण्यासाठी गांडूळ खतासारखे प्रकल्प राबवलेत. गावात येणाऱ्या फेरीवाल्यांकडून व्यवसाय कर म्हणून प्रती वर्ष एक हजार रुपये आकारले जातात. फेरीवाल्यांना ग्रामपंचायतीकडून ओळखपत्र दिलं जातं. खाद्य विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रमाणपत्राशिवाय व्यवसाय करता येत नाही. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतीनं गावातील प्रत्येक कुटुंबाच्या मालकीच्या घराची जागा मोजून त्याच्या हद्दी निश्चित केल्यात. त्यामुळं गावात जागेवरून होणारे वाद, तंटे संपुष्टात आलेत. तसंच देशात किंवा राज्यात नेहमीच तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र, पाटोदा ग्रामवासी याला अपवाद आहेत. इथले ग्रामस्थ स्वत: वार्षिक ताळेबंद मांडून गावचा पैन् पैचा हिशेब ठेवला पाहिजे यासाठी आग्रही असतात. ग्रामपंचायतीच्या आर्थिक नियोजनामुळं या गावचा अर्थसंकल्प हा शिलकी ठरतो. सर्व विकासकामं आणि कर्मचाऱ्यांचा खर्च वजा जाता या ग्रामपंचायतीकडं जवळपास दोन लाख रुपयांची शिल्लक उरते.


शाळा आणि अंगणवाडीचं महत्त्व
गावातील शाळेत अनेक चांगले संस्कार दिले जातात. शाळेत दररोज होणाऱ्या परिपाठात विद्यार्थ्यांना सुविचार, बोधकथा, देशभक्तीपर गीतं, तसंच पसायदान आणि स्वच्छतेचे धडे दिले जातात. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील मुलांनी चार तरी झाडं लावली पाहिजेत, असा नियम घालून दिलाय. गावातील अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी ताईंच्या प्रयत्नामुळं हे गाव आरोग्यदायी आणि कुपोषणमुक्त झालंय. यामुळंच इथल्या अंगणवाडीला आयएसओ ९००१-२००८ या आंतरराष्ट्रीय दर्जाचं नामांकनाचं प्रमाणपत्रही मिळालं आहे.

 

patoda 11विशेष उपक्रम
पाटोद्यात कोणाचाही वाढदिवस असेल तर तो आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. ग्रामपंचायतीच्या बाहेर फळ्यावर शुभेच्छा लिहून अभीष्टचिंतन केलं जातं. नंतर घरी जाऊन ग्रामपंचायतीतर्फे एक शुभेच्छापत्र आणि फुलं दिली जातात. गावकऱ्यांच्या मदतीनं शाळेत, गावात सीसी टीव्ही, सोलर प्रकल्प उभारणार असल्याचं भास्कर पेरे यांनी सांगितलं.

तर अशा या आदर्श पाटोदा गावातील मुलगी सून म्हणून आणायची असेल तर घरी शौचालय आणि घरात, गावात समृद्धी असायलाच हवी. या गावात सून म्हणून आलेल्या लेकीबाळी उगीच नाही स्वत:ला भाग्यवान समजत!

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.