स्पेशल रिपोर्ट

मुसळीनं दिला धनाचा घडा

ब्युरो रिपोर्ट
सातपुडा - पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या चोपडा तालुक्यातील विरवडे गावातील शेतकऱ्याचं जीवन कृषी प्रदर्शनानं बदलून टाकलं. त्याला सफेद मुसळी या औषधी वनस्पतीची माहिती मिळाली. त्याचं त्यानं भरघोस उत्पन घेतल आणि त्याचं जीवनच बदलून गेलं. कुलदीप राजपूतच्या या यशस्वी प्रयोगानं गावकरी चकित झाले आणि त्यांनीही आपल्या शेतात सफेद मुसळीची लागवड करण्यास सुरुवात केली.
 

आधुनिक शेतीची पाळंमुळं आता हळूहळू रुजताहेत. आजचा तरुण शेतकरी नवनवीन शेतीचे प्रयोग आपल्या शेतामध्ये करून शेतीला नवीन दिशा देतोय. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या विरवडे गावातील तरुण शेतकरी कुलदीप राजपूतनं सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून हरभरा आणि सफेद मुसळीची लागवड केली. या लागवडीतून पहिल्याच वर्षात चांगलं उत्पन्न आल्यानं त्यानं या पिकाबाबतची संपूर्ण माहिती संबंधित विभाग आणि व्यावसायिकांकडून घेतली. सफेद मुसळीची काढणी आणि त्यासंबंधीची सर्व माहिती मिळवल्यानंतर कुलदीप यांनी पुढील वर्षी सुमारे ३ एकरात आंतरपीक म्हणून पुन्हा एकदा सफेद मुसळीची लागवड केली. यामध्ये सुमारे ४ ते ५ क्विंटल प्रती एकर प्रमाणं पीक आलं आणि त्याला बाजारपेठेत चांगला भावही मिळाला.

आज याच गावातील २० ते २५ प्रयोगशील शेतकरी सफेद मुसळीचं यशस्वी उत्पादन घेत आहेत. सुरुवातीस आंतरपीक असलेल्या सफेद मुसळीची लागवड आता ते मुख्य पीक म्हणून करताहेत. स्वतः कुलदीपनं ५ एकर शेतात केवळ सफेद मुसळीचं पीक लावलंय. सुमारे १० एकरमधील केळी आणि हळदीच्या पिकात सफेद मुसळीची लागवड आंतरपीक म्हणून केलीय. यंदाच्या वर्षी कुलदीपला एकरी ७-८ क्विंटल उत्पादन मिळालंय. कोरड्या आणि स्वच्छ सफेद मुसळीला बाजारपेठेत सुमारे ८५-९५ हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळतोय. साधारणतः ४-५ क्विंटल ओली सफेद मुसळी वाळवली असता तिचं वजन सुमारे एक क्विंटल भरतं.

 

musaliसफेद मुसळीची लागवड कशी कराल?
सफेद मुसळी ही कंदवर्गीय वनस्पती असून, या वनस्पतीसाठी रेतीमिश्रित आणि पाण्याचा निचरा होणारी शेती आवश्यक आहे. याचं उत्पादन सेंद्रीय पद्धतीनंच घ्यावं लागतं, नाहीतर त्यातील औषधी गुणधर्म टिकत नाहीत. त्यामुळं जैविक खतांचा वापर हा फायदेशीर ठरतो. कमी पाणी असणारी शेती या पिकास उपयुक्त आहे. या पिकासाठी उष्ण आणि समशीतोष्ण हवामान चांगलं आहे. शेतीची योग्य मशागत करून पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात आवश्यकतेनुसार सिंचन करून याच्या कंदांची लागवड करावी लागते. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये हे झाड वाळून जातं. वाळल्यानंतर साधारणतः तीन महिन्यांनी या कंदांची काढणी करतात आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून त्यांना उन्हात वाळवलं जातं. वाळलेल्या या कंदांचं साधारणपणे एकरी साडेचार क्विंटल उत्पादन मिळतं, तर कंदांना २००० रुपये प्रती किलो एवढा भाव मिळतो.

लागवडीसाठी लागणारी बियाणं, काढणीसाठी लागणारे कुशल मजूर, तसंच काढणीनंतर स्वच्छ धुऊन, साफ करून ती वाळवण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची असते. पारंपरिक पद्धतीनं वाळवत असताना तिच्या वजनात आणि आकारमानासह तिच्या सफेदपणावरही परिणाम होतात. तर तिला बाजारपेठेत नेत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. सफेद मुसळी ही वनउपज (वनात उत्पन्न झालेली) असल्यानं पूर्वी तिची वाहतूक करताना वन विभागाकडून परवाने आवश्यक असायचे. परंतु आता राष्ट्रीय वनौषधी आणि फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत अशा परवान्याची आवश्यकता नसतानाही पोलीस, तसंच वन कर्मचारी यांच्याकडून सफेद मुसळी उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असते.

 

कंपन्यांकडून करारावर लागवड
येणाऱ्या पिढीला या औषधी वनस्पतीचा फायदा व्हावा यासाठी आता या वनस्पतीचं शास्त्रीय पद्धतीनं लागवड आणि संगोपन करणं गरजेचं झालंय. आज भारतातील अनेक औषध उत्पादक समूह सफेद मुसळीच्या लागवडीकडं वळलेत. आयुर्वेदिक औषधी उत्पादनात महत्त्वाचा घटक असल्यानं तिची लागवड आता अग्रगण्य औषधी कंपन्या करारावर करू लागल्या आहेत.

 

विविध औषधांमध्ये वापर
सफेद मुसळी ही नामशेष होत चाललेल्या वनौषधींपैकी एक आहे. यात २५ प्रकारचे अल्कोलॉईड जीवनसत्त्वं, प्रथिनं आणि आवश्यक खनिजतत्त्व यांचा स्रोत आहे. यात असलेलं सेफोलिन नावाच्या पॉलिसेकेराइडद्वारे सापोझेनिन नावाचं स्टीरॉईड तयार होतं. याचा वापर अनेक आयुर्वेदिक आणि अॅलोपेथिक औषधांमध्ये केला जातो. नवतारुण्य, जोश आणि जोम प्राप्त करण्यासाठीसुध्दा या औषधाचा उपयोग केला जातो. नपुंसकत्व आणि शुक्रजंतूंची कमतरता यासाठी सफेद मुसळीतील स्टीरॉईड रामबाण उपाय आहेत.

सफेद मुसळीचं शास्त्रीय नाव – क्लोरोफायटम बोरिव्हिलानम, कुळ – लिलियसिस , मराठी नाव- पांढरी मुसळी, हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली, संस्कृत नाव- मुसला. दरवर्षी जागतिक बाजारपेठेत हिचं ५००० मेट्रिक टन एवढं उत्पादन होत असतं. बाजारपेठेत साधारण ४००० ते ५.५०० मेट्रिक टन एवढी मागणी असते. पूर्वी भारतीय जंगलांमध्ये सफेद मुसळी ही गाळप्रवण क्षेत्रात आढळायची. परंतु अनियंत्रित आणि अपरिपक्व सफेद मुसळीच्या तस्करीमुळं, तसंच वाढत्या जंगलतोडीमुळं ही वनस्पती आता दुर्मिळ होत चाललीय.
संपर्क – कुलदीप राजपूत – मोबाईल 9823263474

 

 

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.