अकलूजचा घोडेबाजार

रोहिणी गोसावी

अकलूज – अकलूजला घोडेबाजार भरलाय. देशभरातून आलेल्या जातीवंत घोड्यांनी गजबजलेल्या या बाजाराचा रुबाब काही औरच आहे. मर्सिडीज खरेदी करण्यासाठी जेवढा पैका मोजावा लागतो तेवढं मोल देऊन इथून घोडे खरेदी केले जातायत. एरवी या भीमेच्या काठी न फिरकणारे लक्ष्मीपुत्र भीमथडीच्या तट्टांसाठी चक्क मर्सिडीजमधून येताना दिसताहेत. जवळपास दहा कोटींची उलाढाल होणारा हा घोडेबाजार सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय झालाय.   

घोड्यांच्या जवळपास २०० जाती

जगात घोड्यांच्या जवळपास २०० जाती आढळतात. यांपैकी चार जाती भारतात आहेत. या चार तसंच अन्य जातींच्या काळ्या, पांढऱ्या, तांबड्या जातीवंत घोड्यांनी हा बाजार बहरलाय. पूर्वी पंढरपूरला भरणारा हा घोडेबाजार गेली चार वर्षं अकलूजमध्ये भरतोय. अकलूज बाजार समितीच्या जागेत आणि त्यांच्या सौजन्यानंच हा बाजार भरवला जातो.

घोडं हे जगण्याचं साधन असलेल्या साध्यासुध्या माणसांपासून ते रेसकोर्समध्ये घोडा पळवणारे उद्योगपती आणि लक्ष्मीपुत्र हे या बाजाराचे ग्राहक आहेत. काही जण हौसेपोटी वाट्टेल ती किंमत देऊन घोड्याची खरेदी करतात, तर काही जण आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून. काही जण आपल्या फार्म हाऊसची शोभा वाढवण्यासाठी इथून घोडे खरेदी करून नेतात, तर काही जण पैसे कमावण्याच्या हेतूनं इथं घोडे खरेदी करताना दिसतात. लग्नासाठी घोडे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिक ग्राहकांकडून घोडीला जास्त मागणी असते.

घोड्यांच्या लक्षणांना फार महत्त्व

घोडा खरेदी करताना दर्दी ग्राहक घोड्याच्या लक्षणांना फार महत्त्व देतो. घोड्याच्या या विविध लक्षणांवरून घोड्याची जात आणि त्याचा दर्जा सिद्ध होतो, असं म्हटलं जातं. चाणाक्ष ग्राहक लक्षणांबरोबरच इतर वेगवेगळी वैशिष्ट्यंही तपासून पाहतात. त्यात घोड्याच्या उंचीपासून पायांच्या लांबीपर्यंत, तसंच घोड्याची शरीरयष्टी यालाही मोल आहे. ग्राहक घोड्याच्या चारही बाजूनं उदा. तो समोरून, मागून आणि दोन्ही बाजूनं कसा दिसतो याचीही तपासणी करतात. आकर्षक शरीरयष्टीचा रुबाबदार घोडा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आणि तो खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू होते. घोड्याच्या रंगावरूनही घोड्यांची मागणी आणि किंमत ठरते. 

घोडा खरेदी करताना लक्षणं आणि वैशिष्ट्यांबरोबरच इतर अनेक गोष्टीही गृहीत धरल्या जातात. आपण त्यांना अंद्धश्रद्धा म्हणू हवं तर... पण घोडा खरेदीत त्यांना महत्त्व दिलं जातं. उदा. लाल किंवा काळ्या घोड्याचे चारही पाय पांढऱ्या रंगाच असतील आणि कपाळावरही पांढरा रंग असेल तर अशा घोड्याला `पंचकल्याण` म्हणतात. हा घोडा हा शुभ समजला जातो आणि त्याची किंमतही जास्त असते. घोड्याच्या शरीरावर असणाऱ्या केसांच्या भोवऱ्यांवरूनही त्याची किंमत ठरत असते. घोड्याच्या डोक्यावर जर दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी भोवरा असेल तर तो मालकाला रडवणारा घोडा असा समज आहे. म्हणून त्या घोड्याला कमी मागणी असते. घोड्याच्या पोटावर आणि मानेवर असलेल्या भोवऱ्यांवरूनही त्यांची किंमत ठरत असते. देवमण ही आणखी एक कसोटी घोडा खरेदी करताना लावली जाते. एखाद्या घोड्यामध्ये सगळीच वाईट लक्षणं असली, परंतु त्याच्या मानेवर एक लांब रेषा असेल, तर घोड्यातले सगळे वाईट लक्षणं विसरून तो घोडा खरेदी केला जातो. घोड्याच्या मानेवरील या लांब रेषेला `कंठमण` म्हणतात. या `कंठमण` रेषेमुळं घोड्याचे सर्व वाईट लक्षणं झाकली जातात, असा समज आहे. 

खरेदी-विक्री व्यवहारातील पारदर्शकता  

या घोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच अंशी हा व्यवहार विश्वासावर चालतो. लाखो रुपयांचा हा व्यवहार अनेकदा उधारीवर केला जातो, परंतु महत्त्वाचं म्हणजे घोड्याची योग्य नोंद केलेली कागदपत्रं खरेदीदार आणि ग्राहक यांना देण्यात येतात. विक्रेता - खरेदीदार या दोघांपैकी कुणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिलेली कागदपत्रं हा कायदेशीर पुरावा मानला जातो आणि खरेदी-विक्रीतील फसवणूक टळली जाते. 

एका बाजूला जातीवंत घोड्यांचा बाजार भरतो तर दुसरीकडं छोटे घोडे आणि खेचरं यांचाही बाजार भरतो. याही बाजारात खरेदीदारांची गर्दी असते. ज्यांना आपल्या दैनंदिन व्यवसायात अशा छोट्या घोड्यांची गरज असते असे व्यावसायिक या बाजारात गर्दी करताना दिसतात. 

जातीवंत घोड्यांबद्दल माहिती घेण्याची हौस असणाऱ्यांना किंवा घोड्यांची आवड असणाऱ्यांना हा अकलूजचा घोडेबाजार म्हणजे खरोखरच एक विशेष पर्वणी आहे.

रोहिणी गोसावी, अकलुज

 

 

 

 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.