जागर पाण्याचा

राहुल विळदकर, अहमदनगर
अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातली बरीच गावं टॅंकरवर अवलंबून आहेत, काही ठिकाणी पाण्याशिवाय जगणं अशक्य झाल्यामुळं लोक स्थलांतर करतायत. तर चाऱ्यापाण्याची आबाळ झाल्यानं पोराबाळाप्रमाणं जपलेली जनावरं लोकांनी विक्रीला काढलीत. पण दूरदृष्टी असलेला नेता गावाला मिळाला तर नक्कीच बदल घडतो... काटेकोर नियोजन करून गाव पाण्यानं स्वयंपूर्ण बनवण्याबरोबरच लोकसहभागातून गावाचा विकास साधण्याची किमया केलीय अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या आदर्श हिवरे बाजारनं.
 
मुश्ताक खान, गव्हे, रत्नागिरी
मनात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि अंगी असलेल्या जिद्दीच्या जोरावर एखादी व्यक्ती अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करू शकते, याचाच प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातल्या गव्हे गावातील अरविंद अमृते यांना आला. डोंगराला उतार होता, पाणी लागण्याची शक्यताही नव्हती. पण तीन दशकांच्या अथक परिश्रमांनंतर आणि जलव्यवस्थापनाच्या योजना राबवल्यानं इथं खडकांनाही झरे फुटले आहेत, पाहूयात अमृतेंनी केलेली किमया...
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
दुष्काळामुळं संपूर्ण महाराष्ट्राचा गळा पाणी पाणी करतोय. पाणीटंचाईनं परिसीमाच गाठल्यामुळं गावागावांत टॅंकरच्या संख्येत तिपटीनं वाढ करण्यात आलीय. आई जेवण देईना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झालीय. पण अशातही जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावानं पाण्याचा योग्य ताळेबंद मांडून, पिकांचं व्यवस्थापन करून आणि पाणी वापराचं काटेकोर नियंत्रण करून सर्वांपुढं दुष्काळाच्या भस्मासुरालाही योग्य नियोजनानं यशस्वी तोंड देता येतं हे आपल्या आदर्शानं दाखवून दिलंय.
 
प्रवीण मनोहर, मूर्तिजापूर, अकोला
नदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं कारण गाळानं भरलेल्या नद्या. अरुंद झालेली नदीपात्रं. गाळामुळं नदीत पाणी साचत नाही. सगळं काही रूक्ष होऊन जातं... यावर उपाय शोधलाय, अकोल्यातल्या मूर्तिजापूर गावानं. त्यांनी गावच्या कमळगंगा नदीचंच चक्क पुनर्भरण केलंय. त्यामुळं इतरत्र दुष्काळ असतानाही नदी भरलेली आहे. सारा परिसर हिरवागार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, सोलापूर
आजूबाजूला ओसाड माळरान, पाण्याची कमतरता... पण अशाच ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचा संकल्प घेतलाय, महूदच्या किशोर पटेल यांनी. केळी, ऊस, आणि इतर फळबागांनी हे क्षेत्र फुलावं यासाठी त्यांनी दोन शेततळी उभारुन पाण्याचं नियोजन केलंय. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी 'जिथं शेत, तिथं तळं' या योजनेचा लाभ घेत आधुनिक तंत्रज्ञाची कास धरलीय. सोलापूरच्या दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यात येणाऱ्या महूद गावातली ही शेततळी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असल्यानं पाण्याला सोन्याचा भाव आहे. माणसांची आणि जित्राबांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना तर 'पाण्याचं तेवढं बोला राव...' असाच प्रश्न सर्व जण करतायत. अशा अणीणीच्या काळात औरंगाबादमधील मातोश्री वृद्धाश्रमात भटक्या आणि दावणीच्या जित्राबांची तहान भागवण्यासाठी गर्दी होतेय. आश्चर्य वाटलं ना? हो... इथं जनावरांसाठीची पाणपोई आहे. भटकणारी, तसंच दावणीची जित्राबं घेऊन शेतकरी येतात. मुकी बिचारी पाणी पिऊन तृप्त होतात. वृद्धाश्रम चालवत असलेली ही जनावरांची पाणपोई त्यामुळंच सर्वत्र कुतूहलाचा विषय झालीय. आज दुष्काळ आहे म्हणून  नव्हे तर
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
मराठवाड्यात आता दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्यात. गावविहिरी कोरड्याठाक पडल्यानं अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय. परंतु, जगप्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दौलताबाद गावातील गावकरी पुरेसं पाणी मिळत असल्यानं आनंदी आहेत. ही किमया साधलीय जलपुनर्भरणामुळं! गावविहीर आटल्यानंतर केवळ टँकरची मागणी करून त्याच्याकडं डोळं लावून हे गावकरी बसले नाहीत. त्यांनी शक्कल लढवली. मिळून साऱ्यांनी काम केलं. त्याचं फळ म्हणजे टॅंकर बंद होऊन त्यांना दारात नळानं पुरेसं पाणी येतंय. गावकरी आणि पंचायत यांनी एकीनं काम केलं तरं गावपातळीवरच पाण्याचा प्रश्न सुटू
 
प्रवीण मनोहर, अमरावती
जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार! संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय पेय जल सुरक्षा अभियानांतर्गत या दोन्ही तालुक्यांतील १९० गावांमधील गावकरी आर्थिक अंदाजपत्रकाप्रमाणं पाण्याचं अंदाजपत्रक तयार करतायत. पाण्याचं पुरतं महत्त्व कळल्यानं थेंबाथेंबाचं नियोजन करण्यात ते सध्या गुंग आहेत.
 
शशिकांत कोरे, वाई,सातारा
राज्य सरकारनं हाती घेतलेल्या शेततळ्याच्या मोहिमेला सहकार क्षेत्रानंही ओ देत यासाठी पुढाकार घेतलाय. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं स्वखर्चानं तीन शेततळी खोदलीत. तीही माळरानावरील खडकाळ जमीन फोडून! यामुळं कृष्णा नदी आणि धोम धरणातून पाणी वाहून आणण्यासाठी होणाऱ्या कारखान्याच्या वीजबिलात कपात होऊन पैशांची बचत झालीय. यातून कारखान्याकडं भविष्यासाठी पाण्याची तरतूद झालीय. आता या पाण्याचा वापर शेतकरी ऊस उत्पादनासाठी करतायत.  
 
मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून तो कोकणासाठी वरदायी ठरू शकतो, असं दापोली कृषी विद्यापीठातील जलतज्ज्ञांनी सिद्ध केलंय. अस्तरीत शेततळी उभारल्यास उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होतं. त्यामुळं फळबागा तसंच भाजीपाला यांनाही ही शेततळी उपयुक्त ठरणार आहेत.