लोकांनी लोकांसाठी...

मुश्ताक खान, सिंधुदुर्ग
जगभरात प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्यालाच नामशेष करण्याचा प्रयत्न सरकारनं 2004मध्ये केला होता. गिर्ये परिसरात औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा बेत आखला होता. त्यासाठी हुकूमशाही, दंडुकेशाही आणि अगदी जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या होत्या. पण त्याला भीक न घालता इथल्या नागरिकांनी व्यवस्थेविरुद्ध लढा उभारला अन् सरकारला माघार घ्यायला लागली...
 
भगवान केसभट, जगतसिंगपूर, ओरिसा
गेल्या दहा दिवसांपासून ओरिसातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील गोविंदपूर आणि शेजारील गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन शांततामय मार्गानं ओरिसा सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारलंय. या आंदोलनामध्ये महिलांबरोबर शाळकरी मुलंसुध्दा शाळा बंद ठेवून सहभागी झालीत. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक आदिवासी, दलित, भूमिहीन शेतमजुरांनी पोस्को या मल्टिनॅशनल कंपनीविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलंय.
 
रोहिणी गोसावी, पेण, रायगड
रायगड जिल्ह्याला लढ्यांचा आणि आंदोलनाचा इतिहास लाभलाय. महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनापासून अलीकडंच यशस्वी झालेल्या सेझच्या आंदोलनाचा त्यात समावेश आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, पुणे
शहरं वाढायला लागली की त्यासाठी पाण्यापासून मलनि:सारणापर्यंत आणि रस्ते, वीज यापासून ते कचऱ्यापर्यंतचं नियोजन करावं लागतं. त्यासाठी आसपासच्या गावांचा आधार घेतला जातो. गाववाल्यांना जमेत न धरताच या सुविधा केल्या जातात. साहजिकच त्यातून शहरवासीयांच्या सुविधेसाठी आमचा बळी दिला जातोय की काय, अशी भावना बळावून मग गाववाल्यांचा एल्गार सुरू होतो! पुण्यातील उरळी कांचन कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांनी छेडलेलं आंदोलन हा त्याचाच भाग होता. मागण्या पदरात पडल्यानं 21 वर्षांनंतर का असेना आंदोलन यशस्वी झाल्याचं समाधान ग्रामस्थांना आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मांडेवडगाव, परभणी
परभणी - शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार सर्वपरिचित आहे. त्यातही रेशन दुकान म्हटलं की  बोलायची सोयच नाही. त्याची झळ मुकाट सहन करत सर्वच जण बोलतात,  पण करत काहीच नाहीत. परभणीच्या मानवत तालुक्यातील मांडेवडगाव ग्रामस्थांनी मात्र एकजुटीनं त्याविरुद्ध आवाज उठवला. न्यायालयीन लढा लढून रेशन दुकानदाराचा परवाना रद्द केलाच, शिवाय दोघा तहसीलदारांसह इतर चार जणांवर गुन्हेही दाखल करण्यास भाग पाडलं.