EasyBlog

This is some blog description about this site

ग्लोबल व्हिलेज

कला आणि राजकारण

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 2811
  • 0 Comment

भारतीय राजकारण्यांना काही अपवाद वगळता कलेचे वावडेच आहे. अटल बिहारी वाजपेयी कविता करत. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते. विश्वनाथ प्रतापसिंग चित्र काढत . हे झाले अपवाद. कपिल सिब्बल कविता करून मेसेजवर पाठवतात पण त्या कवितांचा दर्जा संशयास्पद आहे. विश्वनाथ प्रतापसिंग यांना प्रसिद्ध चित्रकार समीर मोंडल काही महिने चित्रकला शिकवत होता.नंतर विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या चित्रांचे प्रदर्शनही मुंबईत झाले ,पण दर्जा यथातथाच होता.एम.एफ.हुसेन, आर. के. नारायण, लता मंगेशकर यांना राज्यसभेत स्थान देण्यात आले. पण यातील कुणीच राज्यसभेत फारसा आवाज उठवला नाही. 

अगदी कलाविषयक मुद्द्यांवरही नाही. आर. के. नारायण यांनी मात्र शाळकरी मुलांच्या दप्तराच्या वाढत्या ओझ्याबद्दल भाषण केले. आणि देशभर त्याची चर्चा झाली. तरी असे दिसते की कला आणि राजकारण यांचे आपल्या देशात फारसे नाते नाही. दोन्ही क्षेत्रातील मंडळी कधीमधी स्वार्थापोटी एकत्र येतात. चित्रपट कलावंतानी सिनेमात किंवा खाजगी आयुष्यात काही अडचण आली की मातोश्रीवर जाऊन लोटांगण घालण्याची प्रथा जुनीच आहे पण राजकारणाचे प्रतिबिंब ज्यात पडले आहे असे चित्रपट किंवा कादंबऱ्या विरळाच.अमेरिकन यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॉन विथ द विंडपासून कोल्ड माउंटनपर्यंत अनेक चित्रपट येतात. उलट त्यापेक्षा कितीतरी अधिक नरसंहार झाला आहे अशा फाळणीवर तुरळक चित्रपट, तमससारखी कादंबरीएवढेच काय ते. याला मुख्य कारण आहे ते आपल्याकडील मोठ्या स्केलवर विचार करता येण्याचा अभाव. लाखो बळी ज्यात गेले तो फाळणीचा हिंसाचार दाखवायचा तर त्याला अॅटनबरोसारखा दिग्दर्शक हवा. गांधींच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याची इच्छा असल्याचे व्ही. शांताराम यांनी इंदिरा गांधींना पत्राद्वारे कळवले होते. तसा उल्लेख शांतारामा या त्यांच्या आत्मचरित्रात आढळतो पण इंदिरा गांधींचा त्यावर विश्वास बसला नसावा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर जब्बार पटेल यांनी चित्रपट बनवला तो बाबासाहेबांच्या आयुष्यातील घटना चोखपणे दाखवतो पण कोट्यावधींच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या नेत्याची उत्तुंगता त्यात तेवढ्या उंचीने येत नाही. काहीतरी कमी असल्याचे जाणवत राहते. अलीकडे चे गव्हेरा(चे हा चित्रपट ) आणि ब्रम्हदेशातील आंग स्यू की( द लेडी हा चित्रपट) यांच्यावरील चित्रपट तीन तासाची मर्यादा ओलांडून जातात आणि तेव्हाच त्यांना त्या व्यक्तिमत्वाला गवसणी घालता येते.

 

राजकारणी संवेदनशील असावेत. अगदी चर्चिल, नेहरूंसारखे विद्वान राजकारणी मिळणे कठीण आहे पण काही महत्वाची पुस्तके त्यांनी वाचलेली असावीत. चांगले चित्रपट, चांगली चित्रप्रदर्शने,गाण्याच्या मैफिली अशा ठिकाणी ते दिसावेत अशी अपेक्षा सामान्य माणसाने करायला हरकत नाही.पण सामान्य माणसात मुळात ती रसिकता आहे का?काही मोठे गायक सोडले तर सर्वसाधारणपणे आपल्याकडील मैफिली मोफत असतात आणि मोफत असल्यावरच लोक जमतात. चित्रप्रदर्शनाला तिकीट लावायची आपल्याकडे कधीच सोय नसते. परदेशात चित्रप्रदर्शनांना पन्नासएक डॉलर किंवा युरो तिकीट असते. ऑपेराची तिकिटे तर हजार डॉलरपर्यंत असतात. आपल्याकडे रसिकता दुथडी भरून वाहते ती चित्रपट संगीतात. मोठ्या गायकाची हुबेहूब नक्कल करणे याला आपण कला मानतो. पूर्वी हा प्रकार फक्त ऑर्केस्ट्रामध्ये चालायचा. आत्ता बऱ्याच हिंदी मराठी वाहिन्यांवर हा धुमाकूळ चालू असतो. नाटक ही मराठी माणसाची आवडती कला म्हणता येईल. आपले राजकारणी भाऊबंदकी, तोतयांचे बंड, वस्त्रहरण अशा कितीतरी नाटकांचे प्लॉट प्रत्यक्षात रंगवताना दिसतात. साहित्य किंवा नात्य संमेलनात राजकारणी गर्दी तिथे वर्दी या न्यायाने दिसू लागले आहेत पण रसिक राजकारण्यांचा देशात अभावच दिसतो.

 

साहित्य , कला, नाटक यामध्ये काही अभिजात कलाकृती वर्षानुवर्षे लोकांच्या मनावर राज्य करत असतात.कलावंतांच्या प्रत्येक नव्या पिढीसमोर जुन्या पिढीच्या कलाकृतींचे नव्याने इंटरप्रीटेशन करण्याचे आव्हान असते. एकेकाळी मराठी नाटक बेकेड, चांगुणा, हयवदन, हॅम्लेट, ऑथेल्लो, महाभारतातील अनेक कथानकांवर आधारित माता द्रौपदी, म्र्युत्युन्जय यासारखी नाटके बसवणे हे आव्हान मानत. आता टीव्ही सिरीयलमध्ये काम करून उरलेल्या वेळात दीडदोन महिन्यात तालीम करून नाटक बसवले जाते. आजचे छापा काटा सारखे सफाईदार आणि यशस्वी नाटक पाहून  माझा एक लेखक  मित्र म्हणतो की  कानेटकर स्कूलचे नाटक आहे. अर्थात ठष्टसारखे अपवाद आहेतच.

 

गेल्या दहाबारा वर्षात मोबाईल, सोशल मीडियातील फेसबुक, व्होट्स अपसारख्या गोष्टींनी रोजच्या दैनंदिन जीवनातील विश्रांतीचा आणि विरंगुळ्याचा वेळ खाउन टाकलाय. त्यांनीच आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहारातही मोठा बदल केलाय. या साऱ्याचा परिणाम कलावंतावर झालाय. अर्थकारण आणि पैसा या गोष्टींशिवाय निर्मिती करता येत नाही. चित्रपटासारख्या माध्यमाच्या बाबतीत हे खरे आहे. पण कथा , कविता, कादंबरी, चित्रकला या बाबतीत कलावंत किती झोकून देतो आणि किती तळ गाठू शकतो यावरच त्याचे मोल ठरू शकते. जर रसिकांची अभिरुची अधिक पातळीवर गेली असेल आणि स्मार्टनेस, सफाईदारपणा यांनी कलेत कन्टेंन्टपेक्षा अधिक प्राधान्य असेल तर दोष काळाइतकाच कलावंतांचासुद्धा आहे. आणि असे परिस्थितीशरण कलावंत अधिक राजकारणाभिमुख झाले आणि राजकारण्यांशी जवळीक त्यांना महत्वाची वाटू लागली तर त्यात नवल काय?

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

२२ वर्षं पत्रकारितेत असून चित्रकला, चित्रपट, साहित्यावर सातत्यानं लिखाण. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, चित्रलेखा यातून लेखन. वॉल स्ट्रीट जर्नल, फ्रान्स 24, टाइम साप्ताहिक या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांसाठी काम केलंय. दुर्मिळ पुस्तकांच्या व्यवसायाच्या माध्यमातून केलेल्या ग्रंथप्रसाराबद्दल पुरस्कार मिळालाय. स्वतःची दोन एकल चित्रप्रदर्शनं भरवली आहेत. दीपलक्ष्मी दिवाळी अंकाचं, तसंच औदुंबर, पुस्तकांच्या सहवासात, जनसंघ ते भाजप अशा पुस्तकांचं संपादन केलंय. लोकेशन NCPA मधून चालणाऱ्या साप्ताहिक काव्यवाचन गटाचं सहसंचालकपद भूषवलंय.