EasyBlog
This is some blog description about this site
मीडियावारी
दूरशिक्षण : मुक्त शिक्षणाचं स्वतंत्र व्यासपीठ
आजच्या युगात शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात जी काही नवीन परिवर्तनं आली आहेत त्यात दूरशिक्षणाचं महत्त्वाचं आणि सर्वोच्च स्थान आहे. विकसित आणि विकसनशील देशातही दूरशिक्षणाचा प्रसार झाला आहे. ‘सर्वांसाठी शिक्षण आणि शिक्षणासाठी सर्व’ ही संकल्पना दूरशिक्षणामुळे प्रत्यक्षात येत आहे.
भारतातील स्थिती : सन 1961 मध्ये भारत सरकारच्या शिक्षणविषयक केंद्रीय सल्लागार मंडळानं केलेल्या शिफारशींनुसार भारतात दूरशिक्षण सुरू झालं. शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगानं या शिफारशींवर विचार केला. 1962 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्यानुसार दिल्ली विद्यापीठानं पत्राचार अभ्यासक्रम आणि दूरशिक्षण संचालनालय सुरू केलं. पुढे त्याचं नाव स्कूल ऑफ करस्पाँडन्स कोर्सेस अॅण्ड डिस्टन्स एज्युकेशन असं करण्यात आलं. बराच कालावधी लोटल्यानंतर म्हणजे 1983 मध्ये आंध्र प्रदेशात मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आलं, जे आज डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं. दूरशिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन झालं ते 1985 मध्ये. या वर्षी दिल्ली येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन झालं. हे विद्यापीठ दूरशिक्षण देणा-या भारतातील सर्वोच्च दहा मुक्त विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. येथे कमी खर्चाचे आणि जवळपास सर्व विषयांचे अभ्यासक्रम आहेत. महाराष्ट्रात 1 जुलै 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अस्तित्वात आलं. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपली कल्पक दृष्टी आणि कार्यप्रणालीच्या माध्यमातून बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांच्या गरजेचं कौशल्यं प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम सुरू केले. शिक्षणाच्या संधीची सोयच अशा विद्यापीठांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
बहुमाध्यमं, माहिती आणि संवाद : विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमाची दारं ज्यांना उघडी नव्हती किंवा ज्यांना तिथपर्यंत जाता येत नव्हतं अशांना मुक्त विद्यापीठानं खुलं निमंत्रण दिलं. दूरशिक्षणाला 1990 पासून मोठ्या प्रमाणावर कलाटणी मिळाली आणि या शिक्षणाचा अधिक विस्तार झाला. तो बहुमाध्यम आणि माहिती, संवाद आणि तंत्रज्ञानाचा विस्तार यांच्यामुळे. सामाजिकदृष्टया कमकुवत घटकांसाठी तर हे शिक्षण एक पर्वणीच ठरलं आहे. या शिक्षणाचा विस्तार बघितला तर असं दिसतं की, भारतात एक राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, 14 राज्य स्तरावरील विद्यापीठं आणि 100हून अधिक संस्था दूरशिक्षणाला वाहिलेल्या आहेत. इग्नू, दिल्ली, अन्नामलई, उस्मानिया, सिक्कीम, मणिपाल, नालंदा, सिम्बॉएसिस, मद्रास विद्यापीठ, महात्मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम, कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ आणि आयसीएफएआय विद्यापीठ, त्रिपुरा ही दूरशिक्षण देणारी नामांकित विद्यापीठं आहेत.
ई-लर्निंग : दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सर्वांपर्यंत सुलभ व्हावं म्हणून विविध माध्यमांचा प्रयोग केला जातो. ई-लर्निंग हा त्यातील एक आधुनिक प्रयोग आहे. शिकणं आणि शिकवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग यालाच ई-लर्निंग हा शब्द वापरण्यात आला आहे. बर्नार्ड लस्किन हा ई-लर्निंगचा जनक होय. आजच्या घडीला ई-लर्निंग हा एक मोठा उद्योग झाला असून, सन 2000च्या आकडेवारीनुसार तो 48 बिलीयनच्या घरात होता. या क्षेत्राकडे युवा पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतांना दिसते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अनेक अद्ययावत साधनांचा उपयोग करून नवी पिढी विविधांगी शिक्षण घेताना दिसत आहे. या पिढीला वर्गात तासन् तास बसून तेच ते ऐकणं भावत नाही म्हणून ते दृक-श्राव्य माध्यमं, ब्लॉग, आभासी वर्ग (व्हर्च्युअल क्लासरूम), व्हिडिओ, यूटयूब, स्काइप, एडोब कनेक्टर आणि वेबकॅमचा उपयोग करून मिळेल तिथून आणि हवं तिथं शिक्षण घेत आहे. घरबसल्या शिकण्याचा प्रयोग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर होत आहे. शिक्षणाचं स्वतंत्र व्यासपीठ या शिक्षणानं सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलं आहे. हे शिक्षण पद्धतशीरपणे मिळावं म्हणून दूरशिक्षण निदेशालय स्थापण्यात आलं आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण देण्यासाठी हे निदेशालय (डीईसी) विद्यापीठ आणि संस्थांना प्रोत्साहन देतं. शिवाय राज्य सरकार व विद्यापीठांना मुक्त विद्यापीठ किंवा संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करतं. मुक्त शिक्षणाकरिता आर्थिक मदत, अनुदान आणि शैक्षणिक दिशानिर्देश देण्याचं कामही हे निदेशालय करतं. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या सेवांची देवाण-घेवाण करून दर्जेदार संशोधनाकरता चालना देण्याचा एक महत्त्वाचा विषय या निदेशालयाच्या दृष्टिपत्रात दिला आहे. शिक्षणाच्या हक्कानुसार सरकारनं सर्वांसाठी ज्ञान आणि ज्ञानासाठी सर्व हे सूत्र ठेवलं आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी 2015 पर्यंत सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे, असं उद्दिष्ट ठेवलं आहे. हे साधायचं असेल तर नव्या पिढीच्या भाषेतच त्यांना शिकविलं पाहिजे.
शिक्षक-विद्यार्थी संवाद : परंपरागत शिक्षण प्रणालीत वर्गामध्ये शिकवत किंवा शिकत असताना शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यात संवादाचा अभाव निर्माण होत असतो. परंतु दूरशिक्षण प्रणालीमध्ये हा अडसर राहत नाही. शिक्षक हा समूहात नव्हे तर व्यक्तिगत पातळीवर शिकवत असतो. विद्यार्थी स्वत: ज्ञान ग्रहण करतो. त्याला जे घ्यायचं त्याचं स्वातंत्र्य असतं. यातून दुहेरी संवाद स्थापित होत असतो. तयार किंवा लादलेला अभ्यासक्रम यापासून तो मुक्त असतो. सिलेबस, पिरेड, सुट्टी किंवा व्हॅकेशन यासारखे शब्द दूरशिक्षणाच्या शब्दकोशातच नाहीत. ज्यांनी शिक्षणाच्या संधी गमावल्या आहेत, रोजगार व नोकरी सांभाळून शिकायचं आहे अशांकरता दूरशिक्षणानं नवी वाट आणि दिशा दिलेली आहे. आजच्या काळात कोणताही गुरू आपल्या शिष्याला शिष्य बनवण्यापासून परावृत्त करण्याचं धाडस करू शकत नाही आणि हे घडत आहे केवळ दूरशिक्षणामुळं.
साक्ष्ारता वाढवण्याचं साधन : दूरशिक्षण हे साक्षरता वाढवण्याचं महत्त्वाचं साधन ठरू शकते. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार देशात 73 टक्के साक्षरता होती. यात महिलांची संख्या 50 टक्क्यांहून जास्त आहे. संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढल्यानं ही संख्या वाढली आहे. आजही जगात 70 कोटीहून अधिक लोक निरक्षर आहेत. यातील सर्वात जास्त निरक्षरता भारत, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे आहे. अर्थात, साक्षरतेच्या संदर्भात विजय मिळवण्यासाठी दूरशिक्षण हे प्रभावी आणि परिणामकारक माध्यम ठरू शकतं.