EasyBlog

This is some blog description about this site

शिवार

सर्जकांचे पंख कापू नका

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1550
  • 0 Comment

स्त्री प्रश्नाकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोन आहेत. सनातन किंवा जुनाट विचार स्त्रीला कधी देवी तर कधी दासी मानतो. तो कालबाह्य झाला आहे. झिडकारला गेला आहे. आधुनिक विचारांमध्येही बरेच मतभेद आहेत. काही जण स्त्रियांचा प्रश्न लैंगिक मानसिकतेचा आहे, असं मानतात. स्त्री विरुद्ध पुरुष असा संघर्ष असल्याचं ते चित्र उभं करतात. हा विचार ताराबाई शिंदे यांनीच शंभर वर्षांपूर्वीच निकाली काढला, तसंच स्त्री आणि पुरुष परस्परपूरक असल्याचं सांगितलं. स्त्रियांचा प्रश्न 'कामाच्या वाटणीचा' असल्याची आधुनिक समजूत अलीकडं निकाली निघाली. मला वाटतं, हा प्रश्न सर्जक विरुद्ध बांडगूळ असा असून, तो प्रामुख्यानं व्यवस्थेशी निगडित आहे. 'उत्पादकांना लुटणाऱ्या व्यवस्थेत सर्जकांचे पंख कापले जातात.' या सूत्रातच स्त्री प्रश्नाची खरी उकल होऊ शकते.

 

व्यक्तीचा नव्हे व्यवस्थेचा प्रश्न
तुलसीदास एक दोह्यात म्हणतात की, 'ढोल, गंवार, पशू, नारी... यह हैं ताडन के अधिकारी'. म्हणजे ढोल, अडाणी, जनावरं आणि बाया या चार घटकांना बदडलंच पाहिजे. यात ढोल आणि गंवार हे शब्द कलावंत आणि शेतकऱ्यांनाही लागू पडतात. म्हणजेच, कलावंत, शेतकरी, जनावरं आणि स्त्रियांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे. यांना उठता लाथ बसता बुक्की मारली तरच हे घटक आपल्या आवाक्यात राहतात. या चार घटकांमध्ये एक आश्चर्यकारक साम्य आहे. हे चारही घटक सृजनाशी निगडित आहेत. कलावंतांच्या डोक्यात कल्पनांची शेती होते. या विश्वात अस्तित्वात नसलेली कल्पना साकारण्याचा ते प्रयत्न करीत असतात. शेतकरी एक दाण्याचे हजार दाणे निर्माण करणाऱ्या प्रकियेतील प्रमुख घटक असतो. जनावरं पिलं देतात आणि स्त्रीसुद्धा अशा अपत्याला जन्म देते, जे या विश्वात अस्तित्वातच नसतं. सर्जनशील घटकांना अंकित ठेवण्याचे प्रयत्न सनातन आहेत.

बांडगुळांची समाज व्यवस्था या चार घटकांना गुलाम बनवत आली आहे, सर्व निर्बंध, नियंत्रण, कठोर बंधनं या चार घटकांवरच लादली जातात. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार म्हणजे अशा व्यवस्थेची निर्मिती, की ज्यात बांडगुळांची सत्ता असणार नाही.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणाला चांगले दिवस आले? असा प्रश्न आपण स्वत:ला विचारला की, आपल्या डोळ्यासमोर राजकारणी, सरकारी अधिकारी, बिल्डर्स, स्मगलर्स, गुंड किेंवा दादा, बुवाबाजी करणारे महाराज, सरकारी कृपा लाभलेले संस्थाचालक, आदी गर्दी करायला लागतात. ही सारी बांडगुळं आहेत. यात कोणीही स्वत: उत्पादक नाही. हे सगळे कोणाच्या तरी कष्टातून निर्माण झालेल्या मालमत्तेवर डल्ला मारणारे आहेत. याउलट भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणाला वाईट दिवस आले? असा प्रश्न विचारला की, आपल्या डोळ्यासमोर शेतकरी, स्त्रिया आणि खरे कलावंत एका कोपऱ्यात उभे राहून अश्रू ढाळत असलेलं चित्र तरळतं. हे घटक काही तरी नवीन निर्माण करणारे आहेत. खूप कष्ट सोसतात. इतिहास काळापासून आजतागायत त्यांचा भयंकर छळ झालेला दिसून येतो. शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. स्त्री जन्मालाच मज्जाव केला जातो आहे, कलावंत लाचारीचं जीवन जगत आहेत. या घटकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. ही व्यवस्था अशीच ठेवून आपण स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार करू शकत नाही. बांडगुळांनी लादलेली पाशवी नियंत्रणं तुटल्याशिवाय हे घटक मुक्त होऊ शकणार नाहीत. स्त्रियांच्या प्रश्नाचं विदारक चित्र कुटुंबात दिसत असलं तरी त्याचं निवारण कुटुंबाच्या पुनर्रचनेत नसून समाजाच्या पुनर्ररचनेत आहे.

स्त्रिया तितुक्या एक एक
अलीकडं सवर्ण जातीतील स्त्रियांविषयी सार्वजनिक स्वरूपात अनुद्गार काढले गेले. हा प्रकार चीड आणणारा आहे. दोन राजांच्या लढाया व्हायच्या आणि घुसलेलं सैन्य तिथल्या स्त्रियांवर बलात्कार करायचं. त्या माऊलींचा काहीच संबंध नसायचा. पण त्यांना छळ सोसावा लागायचा. अनेकींना बंदी करून नेलं जायचं. तो जसा रानटीपणा होता तशीच आज जाती-जाती आणि धर्मा-धर्मातील भांडणात स्त्रियांची अब्रू लुटली जाते. मनुस्मृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी स्त्रियांविषयी अपशब्द काढले तर त्यांच्याशी दोन हात करता येतील. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणारे जेव्हा जातीतील स्त्रियांना लक्ष्य बनवतात, तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकाला जाते.

महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या बाबतीत कधीच जातिभेद केला नाही. सर्व स्त्रियांना शूद्र मानलं गेलं, ही बाब महात्मा जोतिबा फुले यांनी दाखवून दिली. बाह्मण स्त्रियांसाठी त्यांनी केलेलं कार्य सर्वविदित आहे. त्यांच्या एका सहकाऱ्यानं ब्राह्मण स्त्रियांविषयी अनुद्गार काढले त्याच क्षणी महात्मा फुले यांनी त्या सहकाऱ्याशी
आपला संबंध विच्छेद केला होता. एवढंच नव्हे तर 'शेतकऱ्याचा असूड'ची प्रकरणं त्या सहकाऱ्याकडं छापायला देणंही थांबवलं होतं. शेवटी त्या सहकाऱ्यानं आपली चूक कबूल केली, माफी मागितली. त्यानंतरच महात्मा फुले यांनी केवळ लेखनातच स्त्रियांची बाजू उचलून धरली नाही, तर सामाजिक कार्यातही तीच दृष्टी दिसून येते. त्यांच्या खाजगी आयुष्यात देखील स्त्रियांविषयक सन्मान दिसून येतो.

लिंगाच्या आधारावर तुम्ही कोणाला डावलू शकत नाहीत. समतेचं हे तत्त्व अजूनही आपल्या देशात पाळलं जात नाही. त्यास कोणताच नागरी समूह अपवाद नाही. सर्व जाती आणि धर्मांच्या समाजामध्ये स्त्रियांविषयी आदर पक्षपात केला जातो. त्यामुळं कोणी कोणाकडं बोट दाखवू शकत नाही.

केवळ समता नाही पुरेशी
सवर्ण पुरुष आणि सवर्णोतर पुरुष यांच्या क्षमतांमध्ये अजिबात फरक नाही. जातिव्यवस्थेनं सवर्णोतर समाजातील लोकांची संधी मारली म्हणून आपण 'समानते'च्या तत्त्वाच्या आधारावर न्याय मागतो. अनेक लोक याच तत्त्वाच्या आधारावर स्त्रियांचे हक्क मागतात. स्त्रियांच्या बाबतीत ते तेवढं पुरेसं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मनुष्य म्हणून तिला समानतेचा हक्क हवाच, शिवाय तिच्या विशिष्ट क्षमतांसाठी विशेष संधीही हवी. अपत्य जनन ही तिची सर्वांना दिसून येणारी विशेष क्षमता आहे. अलीकडं स्त्रियांच्या विशिष्ट क्षमतांविषयी जगभर अभ्यास केला जात आहे. या अभ्यासकांचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. उदाहरणार्थ, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांकडं शब्दसंख्या जास्त असते. या विशेष क्षमतेला विशेष संधी मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, देवाण-घेवाण, वाटाघाटी, वादविवाद करताना शब्दांचा वापर केला जातो. अशा सर्व ठिकाणी ज्यांच्याकडं अधिक शब्द वापरण्याची क्षमता आहे, त्या स्त्रियांना संधी मिळाली पाहिजे. पुरुषांच्या दोन हातांच्या ताकदीत जेवढा फरक आहे तेवढा स्त्रियांच्या दोन हातांत नसतो, म्हणजेच स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत आपल्या दोन्ही हातांचा वापर अधिक चांगला करू शकतात. मेकॅनिकल इंजिनीयरिंगसारख्या क्षेत्रात या क्षमतेचा अधिक वापर होऊ शकतो.

'अष्टावधान' ही स्त्रियांमधील असामान्य क्षमता सर्वमान्य आहे. एकाच वेळेस अनेक ठिकाणी लक्ष देण्याची ही क्षमता अनेक क्षेत्रांत उपयोगी पडू शकते. चुलीवर भाकर आहे, मागे भात शिजतोय, बाजूला लेकरू खेळतंय, बाहेर काहीतरी आवाज झाला, अशा अनेक ठिकाणी ती एकाच वेळेस लक्ष देऊ शकते. पुरुष मात्र एका वेळेस एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकतो. हजारो वर्षं शिकार केल्यानं एका ठिकाणी लक्ष केंद्रित करून काम करायची सवय लागली. सरकारी नोकरीत पुरुषांना संधी आणि प्राधान्य दिलं गेल्यामुळं कचेरीतील खिडक्यांमध्ये रांगा आल्या. एका प्रकरणानंतर दुसरं प्रकरण करण्याची पध्दत त्यानं स्वीकारली. कचेऱ्यांमध्ये स्त्रियांच्या 'अष्टावधान' या क्षमतेचा वापर करता आला असता तर कामाचा उरक पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिला असता. नियोजन करणं किंवा कट करण्याची स्त्रियांची क्षमता अधिक असल्याचेही निष्कर्ष आले आहेत.
 
स्त्री मनुष्य आहे आणि मनुष्य म्हणून तिला 'समान' अधिकार तर मिळाला पाहिजे. परंतु तिच्या ज्या विशिष्ट क्षमता आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. स्त्रियांना आपण कोंडून ठेवल्यामुळं त्यांच्यातील या सर्व क्षमता समाजाच्या उपयोगात आल्या नाहीत. या क्षमतांमध्ये ती ब्राह्मण आहे वा ती शूद्र आहे म्हणून काहीच फरक पडत नाही. याचा अर्थ असा की, सर्व स्त्रियांच्या या क्षमता पुरुषप्रधान बांडगूळ व्यवस्थेनं कुजवून टाकल्या.

नजीकचं भविष्य जर तंत्रज्ञानाचं असेल तर स्त्रियांच्या विकासाची वाट कोणी रोखू शकणार नाही. तसं झाल्यास मानव जातीनं अद्याप कधीच अनुभवल्या नाहीत, अशा स्त्रियांच्या क्षमता जग अनुभवू शकेल. या क्षमतांमध्ये मानव जात अधिक उन्नत होईल.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

लेखक, पत्रकार, प्रकाशक. 'परिसर प्रकाशन'च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर दर्जेदार पुस्तकं प्रकाशित. धर्मनिरपेक्ष विचारांच्या चळवळीत काम. साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन.