EasyBlog

This is some blog description about this site

शिवार

दुष्काळाशी दोन हात

 • Font size: Larger Smaller
 • Hits: 1910
 • 1 Comment

दुष्काळाची चर्चा सुरू झाली की, विरोधी पक्षांचे नेते म्हणतात, सरकारनं रोजगार हमीची कामं काढावीत, गुरांच्या छावण्या उघडाव्यात, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करावेत. फार फार तर कर्जाची वसुली थांबवावी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं. सरकार म्हणतं... दुष्काळ निवारणासाठी आम्ही इतकी रक्कम मंजूर केली, अमुक इतकी कामं सुरू केली, एवढ्या छावण्यांना एवढी मदत केली, इतके टॅंकर सुरू केले, फी माफ, कर्जवसुली, स्थगिती... झालं. बघता बघता दिवस निघून जातात. पुन्हा दुष्काळाची परिस्थिती येते. विरोधी पक्ष पुन्हा मोर्चे काढतात. सत्ताधारी बैठका घेतात. पुन्हा त्याच मागण्या, पुन्हा त्याच उपाययोजना... मला कळतं तसं, 1972पासून पाहतोय, हाच रिवाज ठरलेला. त्यात तसूभरही फरक पडलेला नाही.

मान्सून कोणत्या काळी नियमित येत होता कोणास ठाऊक? आम्ही पाहतोय तसा तो अनियमितच आहे. कधी धो धो बरसतो तर कधी तोंड दाखवत नाही. कोणत्या वर्षी काय होईल सांगता येत नाही. दरवर्षी एका विलक्षण अनिश्चिततेच्या मानसिकतेत शेतकऱ्याला पेरणी करावी लागते. याला जुगारही म्हणता येत नाही, कारण जुगारात तुम्ही जिंकलात तर मालामाल होता. इथं पाऊसमान चांगलं आलं तरी  मालामाल होण्याची शक्यताच नाहीच. भारताचा शेतकरी दरवर्षी नव्यानं हरणारी अडथळ्यांची शर्यत खेळत राहतो. सरकार दुष्काळावरच्या उपाययोजना करतं, ते केवळ तो या खेळात राहावा यासाठी.  तो या चक्रव्यूहातून बाहेर पडावा यासाठी नव्हे.


माणसानं नैसर्गिक आपत्तींवर मात केली तेव्हा प्रगतीचं पहिलं पाऊल पडलं, असं मानलं जातं. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. ती कोसळली की शेतकरी आजही देशोधडीला लागतो.
म्हणजे प्रगतीची पहिली पायरी चढायची क्षमता देखील शिल्लक राहिलेली नाही. भूकंप वा महापूरसुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. ती आपत्ती कोसळली तर सरसकट सर्वांच्या जीवनावर कमीजास्त प्रमाणात त्याचा परिणाम होतो. भारतात दुष्काळ ही अशी नैसर्गिक आपत्ती आहे की,  त्याचा परिणाम फक्त शेतकऱ्यांना भोगावा लागतो. दुष्काळाचा चटका ना कोण्या कलेक्टरला बसतो ना चपराशाला. ना मंत्र्याला ना सोसायटीच्या चेअरमनला. ना व्यापाऱ्यांना ना व्यावसायिकाला. दुष्काळ पडला आणि व्यापारी देशोधडीला लागले असं कधी आपण ऐकलं नाही.  दुष्काळ पडला आणि सरकारी नोकर खडी फोडायला गेले, असं चित्रही आपण पाहिलं नाही. या नैसर्गिक आपत्तीत सगळे सुरक्षित राहतात आणि फक्त भरडला जातो तो एकटा शेतकरी समाज.  दुष्काळाची आपत्ती कोसळली, तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला भरडलं जाणं भाग आहे. मराठा आहात म्हणून कोणी राज्यकर्ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत. शेतीवर ज्यांचं पोट आहे, शेतीचा उत्कर्ष आणि ऱ्हासावर ज्यांचं जीवन डोलतं ते सर्व शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यात हमखास सापडतात.


दुष्काळाचा पहिला फटका मुक्या जनावरांना बसतो. चारा महागतो. पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं तर जनावरं सांभाळणं कठीण बनतं. जनावरं विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत खाटकांचं फावतं. दुष्काळ ही जनावरांसाठी जीवघेणी आपत्ती ठरते. दुसरा फटका बसतो शेतकरी महिलांना. घर आणि शिवाराचं काम तर त्यांच्या पाचवीला पुजलेलं. आता घर, शिवाराबरोबर रोजगाराची कामंही करावी लागतात. दुष्काळाच्या काळात स्थलांतर करावं लागलं तर स्त्रियांच्या समस्यांना अंत राहत नाही. तिसरा फटका वृध्दांना बसतो. शेतकरी कुटुंबातील जख्ख म्हाताऱ्या माणसांनाही एरवीसुद्धा कामं करावीच लागतात. परंतु दुष्काळाला म्हातारपणाचीही द्या नसते. एका दुष्काळी कामावर सत्तरी ओलांडलेली बाई काम करताना मी पाहिली. तिला विचारलं तर म्हणाली, "घरातील सगळी माणसं कामाला जातात. लहानगी नातही कामाला जाते. मी एकटीनं आयतं बसून खाणं बरं दिसत नाही." एक काडी तुटली तरी खोपा कोसळेल अशी ज्या संसाराची अवस्था असते, तिथं म्हाताऱ्यांनाही ही काळजी घ्यावी लागते. शरीराचं भान विसरून घाम गाळावा लागतो.


शेतीक्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या जवळपास सर्वांना येनकेनप्रकारे दुष्काळाचा फायदा होतो. त्यातही सर्वात जास्त फायदा उपटते सरकारी यंत्रणा. 'युध्दपातळी'वर मुकाबला करावा, असा वरून आदेश सुटायचा अवकाश. बजेट आलं आणि कामं सुरू झाली की वाहत्या गंगेत सरकारी अधिकारी आपापलं घोडं न्हाऊन घेतात. आपली सरकारी यंत्रणा कशी आहे हे सांगायची गरज नाही. जागतिक पातळीवर सर्वात भ्रष्ट प्रशासनाच्या यादीत पहिल्या दहात आपली नोकरशाही आहे.  दुष्काळ निवारणाची जबाबदारी या नोकरशाहीवर सोपवली जाते. अनेक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कामं निघावी म्हणून धडपडत असतात. कामासाठी नव्हे, त्यातून मिळणाऱ्या मलिद्यासाठी. योजनांची अमलबजावणी असो की, अनुदानाचं वाटप, गरजवंतांच्या हातात कमी पडतं. मध्यस्थांचे खिसे मात्र तुडुंब भरतात. अनेक सरकारी  अधिकाऱ्यांच्या बंगल्यांना 'दुष्काळकृपा' असं नाव दिलं तर ते समर्पक ठरेल. पुढाऱ्यांसाठीही हा सुवर्णकाळ असतो हे सर्वांना माहीत आहेच.


मुद्दा असा की,दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची शक्ती शेतकऱ्यांमध्ये का राहिली नाही? शेती धंदा सतत तोट्यात ठेवण्यात आल्यामुळं तो आपत्तीसमोर कोसळतो. यावर पहिला हाच उपाय आहे की, हा धंदा तोट्यात ठेवू नका. दरवर्षी चार पैसे मागे पडतील एवढं उत्पन्न मिळालं पाहिजे, अशी तजवीज करता येत नाही का? करता येते, पण करायची नियत नाही. कारण शेतकऱ्यांकडं चार पैसे खेळू लागले तर ते आपल्याला जुमानणार नाहीत, अशी पुढाऱ्यांना भीती वाटते. शेतकरी गरजवंत राहिला तरच तो आपली किंमत करतो, म्हणून त्याला कायम गरजवंत ठेवलं जातं. जोपर्यंत ही गरज राहील तोपर्यंत पुढारी आणि अधिकाऱ्यांचं प्रत्येक दुष्काळात उखळ पांढरं होत राहणार आहे.


1986 च्या दुष्काळात फिरत असताना एके गावी पाहिलं की, तिथले शेतकरी विहिरी खोदत होते. त्या कामावर बरेच मजूर काम करीत होते. मी एकाला विचारलं, ''कोणत्या योजनेत ही विहीर घेतली? '' तर ते म्हणाले, "या विहिरी आम्ही आमच्या पैशानं पाडतोय. '' मला आश्चर्य वाटलं. ते शेतकरी म्हणाले, "गेल्या वर्षी आम्ही मिरचीचं पीक घेतलं होते. त्यातून बरा पैसा मिळाला. यंदा दुष्काळ आहे. मजुरांना काही काम दिलं नाही तर ते निघून जातील. पुन्हा मिळणाऱ नाहीत. आम्हाला विहिरीची गरज होती,  मजुरांना कामाची गरज होती म्हणून आम्ही हे काम काढलं. विहिरीही होतील आणि मजूरही टिकून राहतील.”  या अनुभवातून असं लक्षात आलं की, शेतकरी स्वत: दुष्काळाचा मुकाबला करू शकतात.  शेतकरी दुष्काळाशी दोन हात करू शकतो. त्या दोन हातात पैसे असतील तर... सरकारनं भाव पाडून त्यांचे दोन्ही हात कापून टाकले तर तो कसा मुकाबला करील?

People in this conversation

Comments (1)

 • खरे पाहता कोणत्याच प्रश्नाच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही आहोत.
  आम्ही उगाचच सबसिडी,कर्ज माफी आणि अशाच मदतीची वाट पाहत
  असतो. भारतीय माणूस खरेच सक्षम आहे, त्याला आम्ही असहाय
  बनवत आहोत. ज्याला पाण्याचं कळतं त्याला धोरण ठरविण्याचा
  अधिकार नाही अशीच काहीशी अवस्था आहे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

लेखक, पत्रकार, प्रकाशक. 'परिसर प्रकाशन'च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर दर्जेदार पुस्तकं प्रकाशित. धर्मनिरपेक्ष विचारांच्या चळवळीत काम. साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन.