EasyBlog

This is some blog description about this site

शिवार

पंख कापलेले पक्षी आणि मोकळं आकाश

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1545
  • 0 Comment

आपल्या लहानपणी नव्हत्या अशा कोणकोणत्या गोष्टी आज आपल्या अवतीभोवती दिसतात, याची मी एकदा यादी करायला बसलो. एका दमात साठ-सत्तर गोष्टींची नोंद झाली. नंतर मला नाद लागला. कोण्या गावाला जाताना ऑटोरिक्षात बसलो की आठवतं... अरे, लहानपणी आपण त्या गावाला चालत गेलो होतो. आता ऑटोरिक्षा आल्यात. मोबाईलवर एसएमएस आला की, अमुकअमुक यांचं निधन झालं. लहानपणी कोणाच्या निधनाची वार्ता कशी पोचायची? असं काहीही. पोराचे कपडे पाहिले की आपले लहानपणीचे कपडे आठवतात. आपला असमंत बदललाय. कसा बदलला? कोणी बदलला?

कोण्या एका कुंभारानं गावात पहिल्यांदा चाक लावलं असेल तेव्हा सगळं गाव ते पाहायला गोळा झालं असेल. एका बारक्याशा आरीवर एवढं मोठं चाक गरागरा फिरताना पाहून आश्चर्य वाटलं असेल. कुंभारानं मातीचा चिखल करून एक गोळा फिरत्या चाकाच्या मध्यभागी टाकला आणि त्याला नुसता हात लावल्याबरोबर मातीला आकार येऊ लागलेला पाहून लोकांनी तोंडात बोट घातलं असेल. अगदी तशी परिस्थिती आज मोबाईलकडं पाहून आपली होते. नाही का?

मानवी इतिहासात जी काही चारदोन वळणं आली असतील, त्यापैकी गेल्या पाचपन्नास वर्षांतील बदल एक मोठं वळण आहे. एवढे बदल ना आपल्या वडिलांनी पाहिले, ना आजोबा, पणजोबा वा खापर पणजोबांनी पाहिले. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' हे तत्त्व या बदलांच्या संदर्भात लागू पडत नाही. आपल्या पिढीत जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे बदल घडले आहेत. घडताहेत. याची जाणीव आज आपल्याला होत नाही. परंतु जेव्हा शंभर एक वर्षानंतर या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भविष्यातील इतिहासकार म्हणतील की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगात जेवढे बदल घडले तेवढे पूर्वी कधीच घडले नव्हते. त्यावेळेस आपण असणार नाही. परंतु आपली साक्ष त्या इतिहासकारांना काढावी लागेल. सुरुवातीलाच एक गोष्ट निकालात काढली पाहिजे, की हे बदल कोणत्याही सत्ताधार्‍यांमुळं झालेले नाहीत. बहुतांश बदल हे संशोधनामुळं झाले आहेत. तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. स्पष्ट सांगायचं तर हे बदल सर्वसामान्यांपर्यंत लवकर पोचू नयेत म्हणून अडथळे आणण्याचंच काम तेवढं शासनात बसलेल्यांनी केलं. राज्यकर्ते नकाशा बदलू शकतात, पण संशोधक जग बदलतात. हा फरक आपण नीट लक्षात घेतला पाहिजे.

1) इलेक्ट्रॉनिक 2) गर्भनिरोधनं 3) अणुबॉम्बचं सार्वत्रिकीकरण 4) शेअर बाजार 5) जेनेटिक्स या पाच मथळ्यांखाली या बदलांचं वर्गीकरण करता येईल. हे सर्व बदल अलीकडच्या पन्नास वर्षांतील आहेत. त्यामुळं पन्नास वर्षांपूर्वीच्या कोणत्याही महात्मा, थोर विभूती, संत, धर्मगुरू, विचारवंत वा कोणीही या परिस्थितीला सामोरे गेलेला नाही. या बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती वा प्रश्नांची उत्तरं पन्नास वर्षांपूवी लिहून ठेवलेल्या पुस्तकांत सापडण्याची शक्यता नाही. आपले आदर्श, आपले महात्मे कितीही थोर असले तरी ते त्यांच्या परिस्थितीत जगले होते. ज्या परिस्थितीचा त्यांनी कधीच सामना केला नाही त्या परिस्थितीविषयी त्यांच्याकडून उत्तरं मागणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. एवढंच नव्हे, तर आपलं दायित्व नाकारण्यासारखं होईल. आता आपणच जळायचं. आपल्याच प्रकाशाचा कंदील करायचा आणि आपणच चाचपडत एक एक पाऊल पुढं टाकायचं. अशी ही वेळ आहे. असा संकल्प केला तरच या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतील. नव्या परिस्थितीला सामोरं जाता येईल. शहामृगासारखं वाळूत मुंडी खुपसून इतिहासाच्या काळोखात कितीही प्रदक्षिणा घातल्या तरी वादळाशी मुकाबला करण्याचं बळ पंखांना मिळू शकणार नाही.

इलेक्ट्रॉनिकचा वापर सुरू झाल्यापासून वस्तूंचं विपुल उत्पादन होऊ लागलं. अकल्पित वस्तू तयार होऊ लागल्या. उदाहरणार्थ, कुंभार चाकावर भांडं तयार करायचा. तेव्हा तो त्या मातीपासून काय काय बनवू शकतो याचा अंदाज करता येत असे. तो तवा, पणती, लोटके, गाडगे, मडके, रांजण फार तर सुरा आदी बनवू शकायचा. इलेक्ट्रॉनिक आल्यानंतर कोणती वस्तू बनेल याचा अंदाज करता येईना. अजब वस्तूंची निर्मिती होऊ लागली. लेकरांची खेळणी पाहिली तरी याची कल्पना येऊ शकते. एका बाजूला विपुलता, मुबलकता आली. दुसर्‍या बाजूला विविधता. टीव्ही, संगणक आणि मोबाईल या तीन वस्तू इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक परिणामकारक देणग्या आहेत. या तीन वस्तूंनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकलाय.

माणसांच्या अवयवांना बळ देण्याचं काम वस्तू करते. तापलेला तवा हाताला पोळू नये म्हणून आपण चिमटा वापरतो. चिमट्यानं हाताला न पोळण्याचं बळ दिलं. आपण पायानं किती चालू शकतो? सायकलीनं त्यापेक्षा जास्त, चारचाकी, रेल्वे आणि विमानानं, अशी कल्पना केली तर लक्षात येईल की, आपल्या पायांची शक्ती वाढत गेली. आपण डोळ्यांनी किती पाहू शकतो? समोर दिसेल तेवढंच. दूरदर्शननं डोळ्यांना अशा गोष्टीही दाखवण्याची सोय केली, ज्या डोळ्यांच्या पलीकडं घडतात. दूरदर्शननं डोळ्यांची शक्ती वाढवली. तसंच मोबाईलनं कानांची शक्ती, श्रवणशक्ती वाढवली. माणसांचे कान एका विशिष्ट अंतरापेक्षा जास्त अंतरावरचं ऐकू शकत नाहीत. पहिल्यांदा फोननं ही शक्ती वाढवली. परंतु जिथं तारा जाऊ शकतात तिथंच फोन असायचा. मोबाईलनं ते बंधन झुगारलं. जिथं तारा नाहीत तिथून ऐकण्याची सोय करून दिली. माणसाच्या मेंदूची शक्ती वाढवणारं तंत्रज्ञान पहिल्यांदा संगणकानं उपलब्ध करून दिलं. माणूस किती गोष्टी, किती काळ लक्षात ठेवू शकतो? माणसांचा मेंदू किती वेगानं प्रक्रिया करू शकतो? त्यापेक्षा अधिक वेगाचं पूरक साधन निर्माण झालं. त्यामुळं पहिल्यांदा माणसाच्या मेंदूला मदत करणारं तंत्रज्ञान उपलब्ध झालं. दूरदर्शन, मोबाईल आणि संगणक या तीन साधनांनी मानवजात उन्नत केली.

दूरदर्शन आलं तेव्हा गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष होते. त्यांनी कडेकोट रशियात पहिल्यांदा टीव्हीला मुभा दिली. काही वर्षात रशिया कोसळला. त्यावेळेस ते म्हणाले होते की, ''रशियामध्ये बदल घडणारच होते. परंतु इतक्या लवकर घडतील असं मला वाटलं नव्हतं. दूरदर्शनमुळं ते लवकर घडलं.'' संगणकांमुळे इंटरनेट आलं. इंटरनेटमुळं जगातील एका कोपर्‍यात पडलेलं ज्ञान किंवा माहिती जगभर पोचण्याची सोय झाली. जगभरातील लोक एकमेकांच्या संपर्कात आले. इजिप्त देशात झालेलं सत्तांतर इंटरनेटमुळं झालं, असं मानलं जातं. लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणाले होते की, ''संस्कृतीचा विकास होण्यासाठी तिचा संकर होमं आवश्यक असतं.'' दूरदर्शन, इंटरनेट ही माध्यमं त्याची अनुकूलता निर्माण करतात. गाव, प्रदेश, देश या मर्यादा ओलांडून मानवजात एक 'वैश्विक संस्कृती' निर्माण करण्याच्या कामाला लागली आहे.

हे सगळे बदल मोहिनी घालणारे आहेत. परंतु या बदलांना सामोरं जाण्यासाठी जी ताकद म्हणजे ऐपत लागते ती किती लोकांकडं आहे. भारतातील कोट्यवधी शेतकरी जगण्या-मरण्याची लढाई लढत आहेत. याच लढाईत अनेक जण धारातीर्थी पडत आहेत. त्यांची क्रयशक्ती कमजोर आहे. त्यांचा धंदा तोट्यात आहे. तो तोट्यात

राहावा अशीच धोरणं राबवली जात आहेत. नव्या तंत्रज्ञानानं जे अवकाश मोकळं केलं, त्याची एकही मंद झुळूक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. क्रयशक्तीच्या अभावामुळं ते बदलत्या जगाच्या परिस्थितीशी सांधा जुळवू शकत नाहीत. संशोधकांनी जे मानवजातीला दिलं ते शासनकर्ते आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्याहीपेक्षा जग बदलत असताना येणारे सगळे ताण मात्र या दुबळ्या लोकांना सोसावे लागत आहेत. भारतीय शेतकर्‍यांची अवस्था पंख कापलेले पक्षी आणि मोकळं आकाश अशी झाली आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

लेखक, पत्रकार, प्रकाशक. 'परिसर प्रकाशन'च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर दर्जेदार पुस्तकं प्रकाशित. धर्मनिरपेक्ष विचारांच्या चळवळीत काम. साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन.