EasyBlog

This is some blog description about this site

शिवार

पत्रकारांची सामाजिक बांधिलकी

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1625
  • 0 Comment

लातूरपासून काही किलोमीटर अंतरावरील हसेगाव. या गावाच्या शिवारात रवी बापाटले या तरुणानं एचआयव्ही असणाऱ्या मुलांचा आश्रम सुरू केलाय. या आश्रमात मुलं आणि मुली मिळून ३२ जण राहतात. पहिलीपासून १२ वीपर्यंतची, म्हणजे ६ वर्षांपासून १६-१७ वर्षापर्यंतची मुलं इथं आहेत. एका शेतकऱ्यानं जमीन दान दिली. परिसरातील काहींनी पालकत्व स्वीकारलं. काहींनी आर्थिक मदत केली. आमदार-खासदार फंडातून काही बांधकाम झालं असलं तरी या प्रकल्पाला सरकारी अनुदान नाही. लोक पुढे येतात. तेच मदत करतात. रवी बापाटले याचं समर्पणही या प्रकल्पाची प्रेरणा आहे. रवीनं सर्वस्व अर्पण केलं आहे. तो पांढरी कफनी, पांढरा सदरा आणि पांढरा गमछा लेवतो. तो पत्रकारितेची नोकरी करीत होता. ती त्यानं सोडली. लग्न न करण्याचा निर्णय केला. याच आश्रमात तो राहतो. अलीकडे रणजीत आणि विद्या हे जोडपं इथं येऊन राहिलं आहे. ते रवीच्या कामाला हातभार लावतात. आणखीही एक-दोन जण आहेत. सगळे विना पगारी.. 

 '२६ ला काही पत्रकार येणार आहेत तुम्ही येऊ शकाल का?' रवीनं विचारलं. मला जिथं नाही म्हणता येत नाही, अशा ठिकाणापैकी ते एक असल्यामुळं मी येतो म्हणालो. रवी बापाटलेनं पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर पहिली नोकरी 'संचार' दैनिकात केली होती. त्यावेळेस संजय आवटे संपादक होते. रवीच्या नेमणूकपत्रावर संजय आवटे यांची सही. त्यामुळे संजयला रवी आपला गुरू मानतो. आपला गुरू येतोय म्हटल्यावर रवीनं त्यांचा सत्कार ठेवला आणि त्यानिमित्तानं काही पत्रकार मित्रांना आमंत्रित केलं. शरद कारखानीस हे 'एकमत'चे संपादक. सेवालयाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध. अतुल देऊळगावकर, महारुद्र मंगनाळे, विजय स्वामी, अनिल पौलकर, जगताप असे सगळेच मित्र यानिमित्तानं एकत्र जमले.

सेवालायातील मुलांनी पाहुणे पत्रकारांना बालतरू भेट देऊन त्यांच्याशी दोस्ती केली.

आपण या कामाकडे कसं वळलो हे रवी बापाटले यांनी सांगितलं. 'समोर जीवन असताना ते पाहून जगणं आणि समोर मृत्यू असताना ते पाहून जगणं यात खूप फरक पडतो.' अशी सुरुवातच चर्र करणारी होती. रवी वक्ता नाही. पण त्यांच्या शब्दाला तपश्चर्येचा गंध असल्यामुळं ते शब्द हृदयाचा ठाव घेतात. पण राणीचे शब्द मात्र हेलावून सोडतात. पुण्याजवळची ही मुलगी. आता १२ वीत आहे. तिला आम्ही अंबाजोगाईला झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात बोलवलं होतं. ती तिचं आत्मकथन सांगते तेव्हा संपूर्ण सभागृह रडताना मी पाहिलं होतं. आजही ती बोलली... शब्दातून व्यक्त होणारी वेदना काय असते ते ती बोलताना अनुभवायला मिळते. अतुल देऊळगावकर यांनी प्रामाणिक माणसाच्या मनावर उमटणारे पडसाद व्यक्त केले. शरद कारखानीस यांनी मात्र मोठा आशावाद व्यक्त केला. जगात सुरू असलेल्या एचआयव्हीवरील संशोधनाचा आढावा घेऊन ते म्हणाले, येत्या ५-७ वर्षात या रोगावर उपचार निघेल. सारं जग त्या क्षणाची वाट पाहात आहे. आपण या मुलांची त्या क्षणाशी गाठ घालून द्यायची आहे. संजय आवटे यांनी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी या विषयावर 'प्रकट चिंतन' केलं. ते म्हणाले, अंधाराचा गाजावाजा होतो, प्रकाशपुंज शांत असतात. असे प्रकाशपुंज पत्रकारितेतही आहेत. रवी बापाटले यांच्या सोबत केलेल्या कामाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.

ही बैठक चालू असताना मला याचं मोठं समाधान वाटत होतं की, 'चांगुलपणा आता अनाथ नाही' रवी बापाटलेसारखे लोक जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहाणारे लोकही समाजात सक्रिय होत असतात. रवीनं काम सुरू केलं तेव्हा त्याच्या मित्र पत्रकारात महारुद्र मंगनाळे आघाडीवर होते. अलीकडे शरद कारखानीससारखे अनुभवी पत्रकार सहकार्य करू लागले... आज संजय, अतुलसारखे नव्या दमाचे पत्रकार पुढे आले. 

२६ जानेवारी रोजी लोकशाहीच्या चौथ्या खांबानं काय करावं, याचा या ठिकाणी वस्तुपाठ मिळाला.

पत्रकार आले. चांगलं चांगलं बोलले. चांगले विचार मांडले आणि निघून गेले. एवढंच झालं असतं तर त्याचं फारसं कौतुक करण्याचं कारण नव्हतं. या पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकलं म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत.

या आश्रमातील एका मुलाचा महिना खर्च १५०० रुपये आहे. १५०० रुपये महिना नियमित देणाऱ्यास पालक म्हटलं जातं. या पत्राकारांपैकी चौघांनी पालकत्व पत्करलं. संजय आवटे (कृषिवल), अनिल पौलकर (दिव्य मराठी), गाथाची आई स्मिता (मिळून साऱ्याजणी ) आणि सचिन चौधरी (छायाचित्रकार) या चौघांनी ही जबाबदारी घेतली. दर २६ जानेवारी रोजी सेवालयात जमायचं. पत्रकारांची कार्यशाळा घ्यायची आणि सामाजिक जाणीव ठेवून लेखन केलेल्या पत्रकारांना पुरस्कार द्यायचा, असे निर्णय करण्यात आले. पुरस्काराच्या भानगडीत न पडता पत्राकारांनी या कामाशी लोकाना जोडून देण्याचं काम केलं तर ते हवं आहे. त्याहीपेक्षा या कामातून जे प्रश्न निर्माण होतात त्याविषयी समाजाचं प्रभावी प्रबोधन करण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे.

चार पत्रकारांनी जबाबदारी स्वीकारून कामाची सुरुवात केली आहे. या ताऱ्यांच्या प्रकाशानं सारं आसमंत उजळो ही शुभेछा...

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

लेखक, पत्रकार, प्रकाशक. 'परिसर प्रकाशन'च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर दर्जेदार पुस्तकं प्रकाशित. धर्मनिरपेक्ष विचारांच्या चळवळीत काम. साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन.