EasyBlog

This is some blog description about this site

शिवार

मराठी पत्रकारितेचं बदलतं स्वरूप

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1994
  • 1 Comment

एकेकाळी मराठी पत्रकारिता मूठभरांची मिरासदारी होती. स्वातंत्र्य आंदोलनात तिनं सामान्य जनांचे विषय हाताळले. परकीयांच्या सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवला. त्या अर्थानं मराठी पत्रकारितेला देदिप्यमान असा इतिहास आहे. तरीही त्याकाळातही मराठी वृत्तपत्रं सामान्यांच्या हातातील दैनंदिन वस्तू नव्हती. शिक्षणाचं अत्यल्प प्रमाण, क्रयशक्तीचा अभाव आदी कारणांमुळं वर्तमानपत्रं वाचनाची ते ‘चैन’ करणं शक्य नव्हतं. मूठभर वाचकांच्या भरोशावर चिमूटभर वृत्तपत्रं चालत असत.

स्वातंत्र्यानंतरदेखील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नव्हता. अनेक नवी वर्तमानपत्रं निघाली. बरीचशी मध्येच बंद पडली. जी टिकली ती राजश्रयाच्या आधारावर. वाचकांच्या आधारावर नाही! ज्या वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींचा वरदहस्त लाभला त्यांनाच टिकाव धरता आला. बहुसंख्य मराठी समाज आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याच्या विवंचनेत होता. शेतकरी आणि श्रमिकांची क्रयशक्ती दुबळी राहिलेली. त्यामुळं संख्येनं मोठा असलेला हा वर्ग नियमित वाचक वा खरेदीदार बनला नाही. या वास्तवामुळं मराठी पत्रकारिता करपली. सत्तेची वा सत्ताधाऱ्यांची कृपा मिळवून व्यवसाय टिकवण्याची धडपड सुरू झाली. याला काही अपवाद जरूर राहिले. परंतु एकंदरीत मराठी पत्रकारिता ज्या नैसर्गिक पद्धतीनं वाढायला पाहिजे होती तशी वाढली नाही.

१९८०पासून छपाईच्या क्षेत्रात नवं तंत्रज्ञान यायला सुरुवात झाली. मराठी वृत्तपत्रांची संख्या झपाट्यानं वाढली. बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती क्षीण असल्यामुळं वृत्तपत्रांचा खप मात्र फारसा वाढला नाही. याच काळात दृक-श्राव्य माध्यमांचा उदय झाला. एकटं दूरदर्शन होतं तोपर्यंत बघणाऱ्यांची संख्या अगदीच कमी होती, मात्र खाजगी वाहिन्या आल्यानंतर मात्र प्रेक्षकांची संख्या झपाट्यानं वाढली. मुद्रित माध्यमांच्या दुपटीहून अधिक लोक, दृक-श्राव्य माध्यमांचा वापर करतात, असं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळं लिहिता-वाचता न येणारा मोठा वर्ग माध्यमांच्या संपर्कात आला, हे या माध्यमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. जगातील अत्याधुनिक शहरांपैकी एक. या शहरात आधुनिक तंत्रज्ञान सर्वात आधी पोचतं. मुंबईच्या मराठी वृत्तपत्रांना त्याचा लाभ होतो. मुंबईच्या मराठी वृत्तपत्रांनी नवं तंत्रज्ञान स्वीकारल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांना ते स्वीकारणं भाग पडतं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागं पडलेली अनेक वर्तमानपत्रं बंद पडली. ऑफसेटच्या छपाई तंत्रानं मराठी वृत्तपत्रांची मुबलकता वाढवली. ९० नंतर आर्थिक उदारीकरणामुळं काही प्रमाणात का होईना खालच्या पातळीवरील क्रयशक्ती वाढली. (विषमताही वाढली). सरकारवरील अवलंबन काहीसं कमी झालं. वाचक आधारित पत्रकारितेची पावलं दिसू लागली. त्यामुळं १९९० नंतरचा काळ हा मराठी माध्यमांच्या विकासाचा सुरुवातीचा काळ मानता येईल. सर्वसान्यांचे प्रश्न आणि देशाच्या स्वातंत्र्याचं बाळकडू घेऊन ज्या मराठी पत्रकारितेचा पिंड घडला, ती मराठी पत्रकारिता मधला भरकटलेला काळ संपवून आज व्यावसायिक रूप धारण करताना दिसत आहे.

भविष्याचा वेध

लिहिलेली माहिती ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. ती कालही महत्त्वाची होती आणि उद्याही राहील. जी बाब दृक-श्राव्य माध्यमांच्या आवाक्यात येऊ शकत नाही आणि ती लिखित माध्यमात व्यक्त होऊ शकते, त्या बाबींसाठी प्रामुख्यानं मुद्रित माध्यम कार्य करील. सवडीनं पाहता येईल, यासाठी माहिती सुरक्षित ठेवण्याची क्षमता मुद्रित माध्यमात आहे. विश्लेषण व्यक्त करण्यासाठी आजही अक्षरांचाच वापर अधिक सुलभपणं केला जातो. नजीकच्या भविष्यात तरी या बाबीला काही पर्याय नाही. त्यामुळं मुद्रित मराठी वृत्तपत्रं अबाधित राहतील. माहितीपेक्षा विश्लेषणाला अधिक महत्त्व येईल आणि मराठीचं वैचारिक नेतृत्व करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं मुद्रित माध्यमांना पार पाडावी लागेल.

वर्तमानपत्रं दिवसभराच्या बातम्या गोळा करून रात्री छापल्या जातात आणि ती वर्तमानपत्रं दुसऱ्या दिवशी सकाळी वाचकांच्या हातात पडतात. एकंदरीत बातमी घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती वाचकांना कळते. आता वाचकांना एवढा विलंब मान्य नाही. मुद्रित माध्यमं जिल्हा पुरवण्या काढू लागली आहेत. एका जिल्ह्यातील बातमी दुसऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्यांना कळणं कठीण झालं आहे. दुसऱ्या प्रदेशात राहणाऱ्यांना त्याहून जास्त अडचण. त्यामुळं बातम्यांच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर लोक विसंबून राहतात. इलेक्ट्रॉनिक न्यूजचा ‘ताजेपणा’ हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळं या क्षेत्राला लोकप्रिय होण्यास वेळ लागला नाही. सुरुवातीला मुंबईबेस असलेलं हे क्षेत्र आता काहीसं विस्तारत आहे. मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे या पट्ट्यात महाराष्ट्राची संपत्ती, महाराष्ट्राची लोकसंख्या आणि महाराष्ट्राचं राजकारण यांचं केंद्रीकरण झालं आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडिया याच भागात केंद्रित होताना दिसतो.

मराठी माणसाचा विदेशात स्थलांतरित होण्याचा इतिहास फार जुना आहे. त्या काळात गेलेल्या माणसांना मराठी मुलुखाची माहिती घेण्याची फारशी साधनं उपलब्ध नव्हती. आपल्या नात्यागोत्यांच्या हालचाली त्यांना पत्रांद्वारे समजत. येणाऱ्या-जाणाऱ्या मुशाफिरांकडून आपल्या भागाची खबरबात कळे. कोणी बराच ऐपतवान आणि चोखंदळ असला तर तो पुढच्या काळात मराठी नियतकालिक मागवे. या सर्व माध्यमांनी मिळणारी माहिती खूप उशिरा मिळत असे. कधी कधी तर महिनोन् महिने लागत. इंटरनेटमुळे आता ही सर्व गैरसोय दूर झाली आहे. क्षणार्धात माहिती मिळणं शक्य झालं आहे.

इंटरनेटवरील मराठी पत्रकारिता हे सर्वात नवं क्षेत्र आहे. अनेक मराठी वृत्तसेवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. इंटरनेटवर मराठी लिहिणं सहज सुलभ झालं तरच ती अगामी काळात टिकू शकेल. मराठीसाठी देवनागरी लिपीत काही सुधारणा कराव्या लागतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं काही प्रयोग सुरू झाले आहेत.

इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या वेगानं वाढला, त्या वेगानं इंटरनेटचा वापर वाढत नाही. त्याचा वेग कमी आहे. त्याचा वापर करणारे लोक प्रामुख्यानं नोकरदार आहेत. विदेशात राहणारे नागरिक आहेत. शहरी भागातील मूठभर लोक आहेत.

अंतरंगातील बदल

तंत्रज्ञामुळे बाह्यांगात जसे बदल होत गेले, तसे अंतरंगात, आशयात बदल होत आहेत काय? या लेखाच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा बदल नमूद केला आहे. तो म्हणजे सरकारी जाहिरातींवरील अवलंबन आता घटत आहे आणि खाजगी जाहिरातींचं प्रमाण वाढताना दिसतंय. खाजगी जाहिरातींचं प्रमाण वाढणं म्हणजे वाचकांची भूमिका वाढणं होय. वाचकांची भूमिका वाढली तरच पत्रकारितेतील आशय बदलू शकेल. मुद्रित मीडिया पूर्वीपेक्षा अधिक जनताभिमुख होताना दिसत असला तरी त्याची गती अत्यंत मंद आहे.

मराठीचा इलेक्ट्रॉनिक मीडिया आज तरी मुद्रित माध्यमात काम केलेल्या लोकांच्या हातात आहे. खालच्या स्तरावरची भरती अगदीच नवख्यांची आहे. नवेपणाच्या चुका स्वाभाविक आहेत. टीआरपी वाढवण्यासाठी मराठी माध्यमांची धडपड अनेकदा हस्यास्पद होताना दिसते. मुद्रित माध्यमांना तब्बल शंभर वर्षांची परंपरा आहे. त्यांनी आता कोठे कात टाकली आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी केली, तशी गंभीरता अद्याप इलेक्ट्रॉनिक माध्यमाला आलेली नाही. एखादी पिढी रुळल्यानंतर कदाचित अधिक प्रगल्भता येऊ शकेल.

विदेशात राहणारा मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक आणि इंटरनेट माध्यमं वापरतो, हे या नव्या काळाचं वेगळंपण आहे. इंटरनेट माध्यमामध्ये तो काही प्रमाणात दिसतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमात मात्र त्यामानानं क्वचित. मुद्रित माध्यमात जवळपास नाहीच. विदेशात गेलेला मराठी माणूस त्या देशाच्या माध्यमांचा अनुभव घेतो. अनेक देशांच्या माध्यमांचा अनुभव घेतलेला मराठी माणूस आता मराठी माध्यमांची, त्यानं अनुभवलेल्या माध्यमांशी तुलना करतो, तेव्हा त्याला भूषणावह वाटावं असं काही आढळत नाही. मराठी माध्यम जागतिक स्तरापासून किती मागं आहे याची त्याला कल्पना येते.

एका बाजूला जगभर विखुरलेली मराठी माणसं त्यांच्याविषयी जाणून घेण्याची स्थानिक माणसांची उत्सुकता आणि दुसऱ्या बाजूला दूरवर गेलेल्या या मराठी माणसाला आपल्या गावातील घडणाऱ्या घटनांची उत्सुकता, असा हा पसारा खोली आणि विस्तार या दोन्ही बाबीत विस्तीर्ण झालेला आहे. मराठी माणूसच नव्हे तर एकंदरीत आपलं विश्व आणि आपला परिसर या दोन्हींची सांगड घालून जगणं सुसह्य करण्याची सध्या धडपड सुरू आहे. नव्या काळातील पत्रकारितेला या दोन्ही टोकांना गवसणी घालावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, की ऑस्ट्रेलियातील भारतीयांवरील हल्ले या दोन्ही बाबी मराठी वाचकांच्या तेवढ्याच उत्सुकतेच्या आहेत, हे समजावून घेऊन मराठी पत्रकारितेला वाटचाल करावी लागणार आहे. दुर्दैवानं मराठी पत्रकारिता मुंबई-ठाणे फार तर पुणे एवढ्याच भागातील प्रश्नांना प्राधान्य देताना दिसते. उर्वरित महाराष्ट्राची पुरेशी दखल घेतली जात नाही.

बदलत्या जगातील नवी मराठी पिढी रुळलेल्या वाटेवर चालणारी नाही, हे मराठी पत्रकारितेला पुरेसं उमजलेलं दिसत नाही. परंपरागत ढाचा टिकवण्याची केविलवाणी धडपड अनेक पत्रकार करताना दिसतात. नव्या पिढीच्या आकांक्षा आणि गरजा विचारात घेऊन मराठी पत्रकारितेनं वाटचाल केली, तरच तिचा निभाव लागेल, अन्यथा तिला कोणीही वाचवू शकणार नाही.

नवे अडथळे

मराठी माणूस सक्षम झाला तरच मराठी जिवंत राहील, असं काही वर्षांपूर्वी सांगितलं जात असे. या काळात असं लक्षात आलं की, मराठी माणूस सक्षम झाला की तो मराठी सोडून इंग्रजीचा वापर करू लागतो. इंग्रजीचा वाढता वापर ही स्वाभाविक बाब आहे. तसंच वाढत्या इंग्रजीचा परिणामही मराठी वृत्तपत्रसृष्टीवर होणंसुद्धा स्वाभाविक आहे. इंग्रजी पत्रसृष्टीला जसा प्रदीर्घ इतिहास आहे, तसंच विविध देशांतील विस्ताराचाही मोठा अनुभव इंग्रजी पत्रकारितेला आहे. त्यामुळं मराठीपेक्षा अधिक सकस मजकूर इंग्रजीत आढळतो. ऐपतदार आणि वृत्तपत्रं खरेदी करू शकणाऱ्या बहुतेक कुटुंबातील नवी पिढी इंग्रजी जाणणारी असल्यामुळं ती मराठी वृत्तपत्र वाचत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? हे मोठं आव्हान मराठी पत्रकारिता व्यावसायापुढं आहे. मुंबईसारख्या शहरात इंग्रजी वृत्तपत्रांचा खप वाढतो आहे आणि मराठी वृत्तपत्रांचा खप घटतो आहे, त्याचं कारण वर दिलं आहे. हे वास्तव समजून घ्यावं लागणार आहे. नुसती मराठीची हाकाटी केल्यानं मराठीचं कल्याण होणार नाही. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तरच ती टिकणार आहे. त्यादृष्टीनं आशादायक चिन्हं आज तरी दिसत नाहीत. एका बाजूला मराठीत वैज्ञानिक संशोधन नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशा दुरवस्थेत ‘मराठी’ जास्त काळ राहिली तर तिला कोण वाचवू शकेल?

मराठीत कसदार लेखनाचा अभाव आहे. अगदीच सुमार दर्जाचं लेखन रकानेच्या रकानं भरून छापलं जातं. अनेक वृत्तपत्रांनी वैचारिक लेखनाची जागा कमी केली आहे. जागतिक स्तरावरील मराठी लेखनाचा तुटवडा मराठी पत्रसृष्टीला खंगवीत चालला आहे. अगदीच सुमार दर्जाचं लेखन मराठीत होत राहिलं तर इंग्रजीच्या समोर मराठीचा टिकाव कसा लागेल?

वर्तमानपत्रं समाजाचा आरसा असतात असं मानलं जातं. मात्र निवडणुकीच्या काळात या आरश्यावर वेगवेगळे लेप चढतात. संपादक किंवा मालकाची विशिष्ट राजकीय विचारसरणी आहे, म्हणून तसा लेप चढला, असं असतं तर ते एक वेळा समजावून घेता आलं असतं. परंतु अमक्या पुढाऱ्यानं पैसे दिले म्हणून त्याच्या बातम्या छापायच्या. त्याची खोटी स्तुती करणारे लेख छापायचे. याही पुढे जाऊन त्याच्या विरोधकांचं शरसंधान करायचं, हा प्रकार पत्रकारितेचा गळा घोटणारा आहे. दुर्दैवानं मराठी पत्रकारितेला याची लागण झाली आहे. मोठमोठी वृत्तपत्रं आणि चॅनल्ससुद्धा ‘पेड न्यूज’चा मोह टाळू शकली नाहीत. पेड न्यूज हा मराठी वृत्तसृष्टीच्या नैसर्गिक विकासातील मोठा अडथळा ठरला आहे. पेड न्यूज हा प्रकार नैतिक दृष्टीनं तर चुकीचाच आहे. तो व्यावसायिक दृष्टीनं जास्त चुकीचा आहे. पेड न्यूजमुळं वाचकांची दरवेळेस फसवणूक होणार असेल तर वाचक वृत्तपत्रं न वाचणं पसंत करतील. याचा फटका वृत्तपत्रांच्या व्यवसायाला बसणार आहे.

नोकरदारांचं नेटवर्क

इंटरनेट माध्यम हे मुद्रित आणि दृक-श्राव्य या दोन्ही माध्यमांची सांगड घालणारे आहे. देशात तसेच विदेशात उपलब्ध होणारे एकमेव साधन. मात्र आज तरी ते उच्चभ्रू वर्गाच्याच हातात आहे. या माध्यमासाठी संगणक आवश्यक आहे. संगणक खरेदी करण्याची क्रयशक्ती आज तरी समाजातील बहुसंख्य लोकांकडे नाही. हे माध्यम आज विशेषत: नोकरदार आणि मीडियातील लोकांच्या हातात आहे. इंटरनेट पत्रकारितेतील जाणकार सचिन परब यांनी सांगितलं की, ‘वर्किंग अवर्समध्ये सर्वाधिक क्लिक होतात, कारण इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात कर्मचारीच करतात. सुट्टीच्या दिवशी निम्मे क्लिक देखील आढळत नाहीत.’

मराठी पत्रकारितेचा इतिहास उज्ज्वल असला तरी मधल्या काळात तिची वाट भरकटली होती. ९०च्यानंतर कात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठी माणूस अलीकडच्या काळात मोठ्या संख्येनं जगभर विखुरला गेला. तो तेथील माध्यमांच्या सहवासात आलेला आहे. तसंच सक्षम मराठी माणूस मराठी सोडून इंग्रजीकडं वळतो आहे. मराठी पत्रकारिता या सगळ्या संक्रमणात सापडली आहे. सारं जग बदलत आहे. या बदलांचा मराठी पत्रसृष्टीवर खोल परिणाम होत आहे. बदलांचा स्वीकार करणं, त्यानुसार आपल्यात बदल करून घेणं, हीच काळाची गरज आहे. लोकल ते ग्लोबल या दोन्ही पातळ्यांवर काम करावं लागणार असल्यामुळं सकस लेखनाचा आग्रह धरणं गरजेचं झालं आहे. या तत्त्वांचा अंगीकार केला तरच मराठी पत्रकारिता टिकाव धरू शकेल.

People in this conversation

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

लेखक, पत्रकार, प्रकाशक. 'परिसर प्रकाशन'च्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर दर्जेदार पुस्तकं प्रकाशित. धर्मनिरपेक्ष विचारांच्या चळवळीत काम. साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचं आयोजन.