EasyBlog

This is some blog description about this site

मार्ग यशाचा

यशासाठी आईस्क्रीम!

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 3358
  • 1 Comment

नमस्कार!

यश म्हणजे काय तर योग्य वेळेला, योग्य कारणांसाठी योग्य पद्धतीनं केलेल्या योग्य गोष्टी, असं मी मागच्या संवादात म्हटलं होतं. आता योग्य गोष्ट म्हणजे काय, तर अशी एखादी गोष्ट, जी करण्यानं आपल्याला काही फायदा होणार आहे, बाकी ती खरंच योग्य आहे का नाही ते प्रत्येकावर अवलंबून आहे. मला विचारलं तर परत अजून एक यशाची व्याख्या डोळ्यासमोर येते आणि ती अशी आहे. सातत्यानं वाढत आणि बदलत जाणाऱ्या वैयक्तिक मूल्यवान ध्येयांची पूर्तता.

यातून आता अजून एक नवा शब्द मिळालाय, तो म्हणजे ध्येय! ध्येय, उद्दिष्ट, ज्याच्यासाठी माझी काही करायची तयारी आहे, ज्याच्यासाठी मी मेहनत करणार आहे, वेळ देणार आहे अशी एक गोष्ट, जी मला हवीच आहे, जी मला पुढं जायला मदत करणार आहे, कारण आपण मागंच बघितलं आहे, की थांबला तो संपला!

वाहतं पाणीदेखील जर थांबलं तर त्याचं डबकं होतं आणि डबक्यातलं बेडकाचं जग जसं मर्यादित असतं, तसं आयुष्य जर मला चालणार असेल, तर प्रश्नच नाही. पण मला जर प्रवाही राहायचं आहे, पुढे जायचं आहे, सातत्यानं नवीन काही तरी करायचं आहे, प्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनंही जायची माझी तयारी आहे, तर मग मला नदी, झरा, ओढा यांसारखं प्रवाहीच राहायला हवंय.

यश तर पाहिजे आहे, त्यासाठी प्रयत्न, कष्ट करायची माझी तयारी आहे, पण नुसती मेहनत करून जर यश मिळणार असेल तर मग गाढवंही जगात सर्वात यशस्वी जमात ठरली असती नाही का? तर यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे त्याचा थोडा विचार करूया.

मला काय हवं आहे ते जर मला समजत असेल किंवा तसा विचार माझ्या डोक्यात असेल तर काम बरंचसं सोपं होतं, कारण मग मी माझं ध्येय/ उद्दिष्ट नक्की करू शकतो. आणि हे ध्येयच मला माझ्या यशाचा मार्ग दाखवत असतं. ध्येय किंवा उद्दिष्ट म्हटलं की खूप काही मोठं किंवा अत्यंत जगावेगळं काही असायला पाहिजे असं काही नाही, तर मला जे करायचं आहे त्याला मी जर निश्चित आकार दिला आणि त्यासाठी करायला लागणाऱ्या प्रयत्नांची जर मी मांडणी केली तर ते माझं ध्येय होऊ शकतं.

काही ध्येय तत्कालीन (short term ) असतात, तर काही मध्यम कालावधीची (medium term ) आणि काही लांब टप्प्याची (long term ) असतात. काही ध्येय तत्कालीन (short term ) असतात, तर काही मध्यम कालावधीची (medium term) आणि काही लांब टप्प्याची (long term ) असतात. ही ध्येयं आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर आपण योग्य दिशेनं चाललो आहोत की नाही याचा आढावा घेण्यासही मदत करतात. विचार करा, सुट्टी आहे म्हणून मी घरातून बाहेर पडून बसस्थानकावर आलोय, मनात काही ठरलेलं नाही, की कुठं जायचं आहे. तर मग आता नक्की कुठं जायचं, कारण समोर तर वेगवेगळ्या दिशेनं वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस समोर दिसत आहेत, पण कुठे जाऊ हेच माहीत नसल्यानं प्रमाणात प्रचंड गोंधळ आहे, इकडे जाऊ की तिकडे जाऊ! आणि विचार करता करता थोड्या वेळानं लक्षात येतं की, अरे, आपल्याला जिथं जायला आवडलं असतं तिथं जाणारी बस तर कधीच निघून गेली!

आयुष्याचं पण तसंच आहे, मला काय करायचं आहे, तेच जर मला समजत नसेल, किंवा अजूनही वाईट म्हणजे समजूनही उमजत नसेल, तर आपली अवस्था अशीच होणार हे नक्की. पण जेव्हा समजेल तेव्हा कदाचित फार उशीर झालेला असेल. म्हणूनच मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे, काय कमवायचं आहे याचा जर मी नीट विचार केला तरच माझी ध्येय माझ्या मनात आणि माझ्या डोळ्यासमोर सुस्पष्ट असतील आणि माझा त्यादृष्टीनं प्रवास सोपा होणार आहे. दिशाहीन प्रवास हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, त्यातून कदाचित खूप चांगलं सृष्टिसौंदर्य बघायला मिळेल, पण हाती मात्र नक्कीच काहीच लागणार नाही.

एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटतेय. यश मिळवण्यासाठी काय लागतं? हा जर प्रश्न तुम्ही मला साधारण एक महिन्यापूर्वी विचारला असतात तर मी तुम्हाला एक ठोकळेबाज उत्तर दिलं असते, की यश पाहिजे असेल तर डोळ्यासमोर ध्येय हवं आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत करायला हवी. बरोबर आहे ना?

अहो, मीच तर आतापर्यंत तुम्हाला माझ्या या ब्लॉगमधून तेच सांगत आलोय, की यशासाठी या गोष्टी हव्यात म्हणून, तर मग हे उत्तर चूक कसं असेल. नाही, हे उत्तरसुद्धा बरोबरच आहे, पण त्याच्या जोडीनं अजून आपल्या अत्यंत आवडत्या गोष्टीचीही यशासाठी तेवढीच गरज आहे. कोणती आवडती गोष्ट?

अहो, आईसक्रीम! हो, बरोबर वाचलंत, आईस्क्रीम. पण प्रश्न असा पडतोय की, यशाचा आणि आईस्क्रीमचा संबंध म्हणजे बऱ्याचदा यश मिळाल्यावर ते साजरं करायला आपण आईस्क्रीम खातो, बरोबर ना? मग यश मिळवण्यात त्याचा काय वाटा? यात तर फक्त त्या दुकानदाराचा फायदा दिसतोय!

काय आहे, बऱ्याच वेळेला आपण आपला सरळसोट विचार करतो आणि मग असे प्रश्न पडतात. थोडा वेगळा विचार करणारा माणूस नेहमीच एक पाऊल पुढे असतो आणि म्हणूनच आपण या आईस्क्रीमचा थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करूयात...

परत एकदा मी म्हणतोय की जर आयुष्यात मला यश हवंय, तर माझ्याकडे आईसक्रीम असणं अत्यंत जरुरी आहे. का, ते आता आपण बघूयात...

साधारण आईस्क्रीम म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो थंडगार, वेगवेगळ्या स्वादांचा मजेशीर पदार्थ, लहानथोर सर्वांना आवडणारा. आता हा झाला सर्वसामान्य विचार, पण थोडा वेगळा विचार केला की त्यातून काय बाहेर येतंय ते पाहा...

आ  - आत्मविश्वास

ई   - इच्छाशक्ती

स  - सकारात्मक दृष्टिकोन

क्री  - क्रियाशीलता

म  - महत्त्वाकांक्षा

काय, कसं वाटलं हे नवीन आईस्क्रीम? आहे ना पसंत?

आतासाठी एवढंच, बाकी ध्येय, आईस्क्रीम आणि इतर जरुरी गुणधर्म यावर विस्तारानं पुढील पोस्टपासून.

तोपर्यंत... राम राम...

(क्रमश:)

People in this conversation

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

व्यवसायाने इंजिनीयर. शिक्षणविषयक विविध उपक्रमात सहभाग. व्यक्तिमत्त्व विकास हा आवडीचा विषय. याच विषयात विविध प्रयोग करत असतात.