EasyBlog

This is some blog description about this site

अगदी मनापासून...

कुणी नाही उरला वाली...

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1310
  • 1 Comment

तबरेज सायेकर हा जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या निर्मितीतला पहिला बळी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. तो साखरीनाटे गावचा, मुस्लिम दालदी समाजातला. तो गेल्या नंतर त्याचे आई-वडील अक्षरश: रस्त्यावर आले आहेत. त्यांचा कुणीही वाली उरलेला नाही कारण त्यांचा तो एकमेव आधार होता.

गेल्याच आठवड्यात मी तबरेजच्या आई-वडिलांना भेटलो. मला अभिमान वाटतो, की मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचणारा राज्यातला पहिलाच पत्रकार आहे. गेल्या दीड वर्षात एकही पत्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, हे खेदजनकच आहे. वाईट वाटलं मला. सरकारी अधिकारी, मंत्री यांच्याकडून सामान्यांना तर आता अपेक्षाच राहिलेली नाही. मग मनात विचार येतो की दीड वर्षात कोणीही दखल न घ्यावी असं काय पाप केलं होतं तबरेजनं.

तबरेजचा गुन्हा हा, की त्यानं सरकार या परिसरात जबरदस्तीनं आणू पाहत असलेल्या अणूऊर्जा प्रकल्पाला, मच्छिमारी व्यावसाय बुडेल या भितीनं विरोध केला! पण याचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे त्याच्या आई-वडिलांना. अलीकडच्या काळात तबरेजच्या वडिलांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय. त्यांना त्यांच्या सोबत जाण्यासाठी एकही माणूस मिळत नव्हता. अनेक वेळा मिन्नतवारी करुन, खेपा घालून एक व्यक्ती तयार झाली. मग कुठं अब्दुल सत्तार यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. या छोट्या छोट्या अडचणी कोण समजणार, कोणाकडे ही गाऱ्हाणी मांडायची. माय-बाप सरकार तर बहिरं झालं आहे, अशीच त्यांची भावना होती.

मित्रांनो, मी जेव्हा त्यांच्या घरात पोहोचलो तेव्हा जाणवलं किती साधी आहेत ही लोकं. किती गरीबीनं पिचलेला आहे हा समाज. मुख्य प्रवाहापासून आठ हात लांब आहेत ही लोकं. त्यांचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आणि मासे विक्री. तबरेजची आई आता मासे विकण्यासाठी बाहेर पडू लागली आहे. त्याचं कारण आता वेगळं सांगायची जरूरी नाही. मी त्यांच्या घरात ३० मिनिटं होतो. तबरेजची आई ओक्साबोक्शी रडत होती. मीही सुन्न झालो. खरं तर मी त्यांची मुलाखत घेत होतो. मला त्यावेळी काय बोलावं हेच सुचत नव्हतं. टीव्ही जर्नलिझमध्ये आपण काय बोलतो हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी काय बोललो हे मला त्याक्षणाला कळलच नाही. माझी परिस्थिती ३० मिनिटांत अशी झाली. विचार करा तबरेजच्या आई-वडिलांच्या मनस्थितीची. आपल्या १० X १० च्या खोलीत ही दोघं आपल्या उद्धवस्त संसाराचा गाडा मुलाच्या आठवणींसोबत हाकत आहेत.

सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्या घरापर्यंत का पोहोचला नाही? मंत्री का पोहोचला नाही? ते गरीब आहेत म्हणून की आणखी काय असा प्रश्न पडतो. मी गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात अशी भावना निर्माण होते आहे की अल्पखंख्यांकांचा वाली कोणीच नाही. राजकारणी आमचा निवडणुकीच्या काळात फक्त वापर करुन घेतात. सरकार आमच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करतं, अशी प्रतिक्रिया परिसरात व्यक्त होतेय. आता हेच बघा ना, तबरेजच्या कुटुंबियांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली पण सरकारनं मॅजिस्ट्रेट चौकशीला मंजुरी दिली. सरकारी अधिकारी चौकशीसाठी गावात आले. तबरेजच्या आई-वडिलांना त्यांनी ग्रामपंचायतीत बोलावून घेतलं पण त्यांच्या घरात गेले नाहीत, का असं? ती माणसं नाहीत का? सरकारनं त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. आपल्या या देशात वेगळा न्याय दिला जातो अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये ही काळजी सरकारनं घेतलीच पाहिजे. तरच सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल आणि न्याय अन्यायाच्या भावना निर्माण होणार नाहीत. 

त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे भारतात राहणाऱ्या कोणत्याही समाजातल्या व्यक्तीला आपण या देशातले, या समाजातले नाहीत का? असा प्रश्न पडताच कामा नये. जर एखाद्याला असा प्रश्न पडला तर भारतीय समाज म्हणून आपण आपल्याला तपासून घेतलं पाहिजे. 

जय हिंद...

 

People in this conversation

Comments (1)

  • अभिमान वाटतो अश्या पत्रकारितेचा ....तुमच्या या कामगिरीला सलाम....

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

पत्रकार म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ मुंबईत काम. टीव्ही चॅनेलमध्ये अँकर, तसंच प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव. कविता सादरीकरणाचा छंद. सध्या `भारत 4इंडिया`चे रत्नागिरी ब्युरो चीफ म्हणून कार्यरत.