युरोपच्या दौऱ्यात मिळाली माहिती
जगभरातील उत्पादनाच्या तुलनेत भारतात द्राक्षांचं पीक खूपच कमी घेतलं. त्यातही नाशिक, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक द्राक्ष पिकतात. द्राक्षांचा मळा म्हटलं की पाणी आलंच. त्यामुळं द्राक्ष पिकवणारा शेतकरी म्हणजे बागायतदारच, असाच आपला ठाम समज. त्यामुळं माळरानावर द्राक्ष पिकवण्याचा विचार म्हणजे वेडगळपणाचं असं कुणालाही वाटेल. होळकरांचाही असाच काहीसा समज होता. पण त्यांनी केलेल्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यात युरोपियन लोक पाण्याशिवाय द्राक्ष पिकवत असल्याचं पाहिलं आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी त्याची इत्थंभूत माहिती घेतली आणि माळरानावर द्राक्ष पिकवण्याचा निर्धार केला आणि प्रत्यक्षात आणला. आज त्यांनी सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेली द्राक्ष इतरांपेक्षा आकारानं आणि चवीनंही हटके आहेत.
सेंद्रीय खतं आणि अत्यल्प पाणी
कोरडवाहू शेतीत द्राक्ष पिकवण्यासाठी विशेष काहीच केलं नाही, असं होळकर सांगतात. रासायनिक खतांचा अजिबात वापर केला नाही. पूर्णपणं सेंद्रीय पद्धतीनंच शेती केली. पावसाळ्याच्या तोंडावर ते द्राक्ष शेतीत बाजरी टाकतात. त्यानंतर शेतात येणाऱ्या गवताचं मल्चिंग करून त्याचा खत म्हणून वापर करतात. पाण्याचं म्हणालं तर एका वेलीला आठवड्यातून एकदा केवळ 20 ते 25 लिटर पाणी देतात. सध्या द्राक्ष शेतीला लागणाऱ्या पाण्याचा विचार करता, हे प्रमाण अत्यल्प आहे.
एकरी तीन टन उत्पादन
होळकरांकडे द्राक्षाची मोठी शेती आहे. वाईनसाठी लागणारी द्राक्ष ते पिकवतात. त्यासोबतच माळरानावर त्यांनी ही खाण्याची द्राक्ष पिकवलीत. या द्राक्षाचं उत्पादन एकरी तीन टन एवढं निघतं. रासायनिक शेतीत हेच उत्पादन १० ते १२ टनांपर्यंत जातं. मात्र गुणवत्तेचा विचार करता सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेली द्राक्ष चवीला कधीही सरसच असतात. चव घेतली की, त्यातील फरक कोणाच्याही पटकन लक्षात येतो. त्यामुळं त्यांना दरही चांगला मिळतो. आजच्या घडीला इतर द्राक्षांना मिळणाऱ्या दराच्या तुलनेत त्यांना दुपटीहून अधिक भाव मिळतोय. मार्केटिंगचा फारसा त्यांना प्रश्न येत नाही. चव हेच आमचं मार्केटिंग, त्यामुळं द्राक्ष तोंडात घातलं की त्यातल्या त्यात मालदार ग्राहक ते खरेदी करतोच, असा त्यांचा अनुभव आहे.
रोगराईचं टेन्शन नाही
द्राक्ष शेती म्हटली की शेतकऱ्यांना सर्वात जास्त काळजी असते ती त्यांच्यावर पडणाऱ्या रोगांची. वातावरण आणि हवामानात थोडासाही बदल झाला तरी त्याचा परिणाम हा द्राक्षांवर होत असतो, पण सेंद्रीय पद्धतीनं उगवलेली ही द्राक्ष सहजासहजी रोगांना बळी पडत नाहीत. आणि पडली तरीही त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेंद्रीय खतांचाच वापर केला जातो. तेवढ्यावर रोग टळून ती पुन्हा उभारी घेतात. त्यासाठी रसायनांचा वापर करण्याची गरज भासत नाही.
होळकर यांची द्राक्ष शेती ही विंचूर वाईन पार्कशी संलग्न आहे, त्यामुळं त्यांच्याकडं पिकणारी काही द्राक्ष ही वाईनरीला, तर खास सेंद्रीय पद्धतीनं लावलेली द्राक्ष खाण्यासाठी विकली जातात.
Comments (1)
-
आण्णा... तुमच्या सारख्या हुशार आणि जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना खुप गरज आहे .