आज घोटीचा प्रसिद्ध बैलबाजार. हा बाजार आज बाजारपेठेत न भरता 'भारत4इंडियानं' भरवलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत भरला आहे. त्यामुळे सकाळपासून असलेली शेतकऱ्यांची गर्दी इथ आताही कायम आहे. शेतकऱ्यांनी आपापल्यापरीनं अंदाज बांधून ठेवले आहेत. तरीही शेवटी कुणाच्या हातात बक्षिसाची ढाल जाणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
असं झालं परीक्षण
डांगी ही या परिसरातील वैशिष्टयपूर्ण जात. या जातीचं मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हे आहे. उंच आणि फुगीर कपाळ, तेलकट पांढऱ्या त्वचेवर गोल काळे मोठे ठिपके, वैशिष्ट्यपूर्ण काळे खूर ही या डांगी जातीला मिळालेली नैसर्गिक देणगी. यामुळंच धो धो पावसात, चिखलात ही जात टिकून राहिली आहे. भातलावणीच्या वेळी गुडघा गुडघा चिखलामध्ये हे बैल दिवस दिवसभर काम करतात. इगतपुरीत दोन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. या धुवांधार पावसातही हे बैल टिकाव धरून राहतात. डांगी बैलांच्या या सर्व वैशिष्ट्यांची डॉक्टरांनी कसून तपासणी केली आहे. 'अदात' अर्थात दात नसलेले, 'दोन दात' अर्थात दुधाचे दोन दात असलेले, 'चार दात', 'सहा दात' आणि 'जुळलेले दात' अर्थात परिपूर्ण वाढ झालेला बैल असे डांगी आणि खिल्लार बैल स्पर्धेत आहेत.
अदात सहा महिन्यांचा, दोन दात अडीच वर्षांचा, चार दात साडेचार वर्षांचा, सहा दात साडेसहा वर्षांचा आणि जुळलेले जात पूर्ण वाढ झालेला अशा प्रकारचे बैल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. काळेकुळकुळीत डोळे, अंगावरचे मोठमोठे काळे ठिपके, त्वचेचा तेलकटपणा, उभं राहण्याची पद्धत, तोंडावर आलेले घामाचे थेंब या वैशिष्ट्यांचं डॉक्टरांनी परीक्षण केलं.
अकोले, अहमदनगर, शहापूर, ठाणे, मोखाडा, दिंडोरी, चांदवड, देवळा, सटाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगणा, निफाड या तालुक्यांतून शेतकरी आले आहेत.
डांगी, खिल्लारचा होणार अभ्यास
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या डांगी, खिल्लार बैलांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या जनुकांचा अभ्यास होणार आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी, मुंबई या पशुवैद्यकीय महाविद्यालयात याबाबत अभ्यास होणार आहे. भरपूर पावसात टिकणाऱ्या या बैलांच्या दुर्मिळ जातीचा विकास आणि जतन करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. कारण संपूर्ण भारतात ही जात फक्त अकोले आणि इगतपुरी या भागातच आढळते. आता केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही या डांगी बैलांना मागणी वाढत आहे. त्यामुळं 'भारत4इंडिया' या बैलांची प्रदर्शनं आयोजित करून त्यांची माहिती अभ्यासासाठी पशुसंवर्धन विभागाकडे देणार आहे. चांगल्या जातींच्या वळूंचा गुणसूत्रीय अभ्यास केला जाऊन त्यांचं बीज गावोगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Comments
- No comments found