काय आहे 'जागर पाण्याचा'?
पावसाचा कालावधी सरत असताना म्हणजे अगदी गत नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्याला दुष्काळाची चाहूल लागली. तेव्हापासून यत्रतत्र सर्वत्र दुष्काळाचेच पडघम वाजू लागले. 1972पेक्षाही यंदाचा दुष्काळ कसा भीषण आहे, याचे दाखले दिले जाऊ लागले. त्यावेळी धान्याचा दुष्काळ, पण यंदा पाण्याचा आहे... त्यामुळं पाणी पेटणार, अशी भाकितं वर्तवली जाऊ लागली. राजकीय नेत्यांच्या भाषणांची सुरुवात आणि शेवट दुष्काळानंच होऊ लागला. वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने दुष्काळाच्या बातम्यांनी भरू लागले. टीव्हीवरती कोरड्या पडलेल्या विहिरी, पाण्यासाठीची महिलांची होणारी वणवण आणि पाण्याअभावी जळून गेलेली पिकं, यांचं चित्रण पाहायला मिळू लागलं, आणि बघता बघता पाणी पेटलंही... पण 'भारत4इंडिया'नं हटके विचार केला.
...आणि यशोगाथा साकारल्या
दुष्काळग्रस्त जनतेला सरकारचा आधार मिळतो आहेच. या मदतीच्या जोडीला त्यांना हवी आहे, परिस्थितीशी झगडण्यासाठीची मानसिक उभारी. दुष्काळाशी झुंजणारी, पाणी जपणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेतच. त्यांची ही धडपड आम्ही कॅमेऱ्यात टिपून त्यांच्या यशोगाथा 'भारत4इंडिया.कॉम' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केल्या आहेत, आणि त्या मालिकेला नाव दिलं, 'जागर पाण्याचा'! आम्ही आमच्यापरीनं हा जागर बांधापर्यंत पोहोचवला आणि शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली, ती पाणी राखण्याची! साहजिकच समाजाच्या सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक झालं.
प्रश्न आहे तिथं उत्तरही आहेच!
जिथं जिथं दुष्काळाच्या नावावर गंभीर प्रश्न आहेत, त्याच परिसरात त्याची पूर्वांपार उत्तरं आहेत. या उत्तरांचा शोध आपण सर्वांनीच घ्यायला हवा. शेतकरी आपापल्यापरीनं जे अभिनव प्रयोग करीत आहेत, त्याकडं म्हणूनच डोळसपणं पाहण्याची गरज आहे. ही भूमिका घेऊन या प्रश्नाशी निगडित सर्वच घटकांनी एक मोठा जागर करण्याची गरज वर्तवून आम्ही 'भारत4इंडिया'मधून हा पाण्याचा जागर सुरू केला. दुष्काळातही पाणी जपून परिसर हिरवागार ठेवणारी राज्यभरातली माणसं, त्यांची गावं, संस्था यांच्या या यशोगाथा दुष्काळग्रस्त भागातील जनतेसमोर याव्यात, त्यातून त्यांनी ऊर्जा, उभारी, प्रेरणा घ्यावी, असा आमचा उद्देश आहे. त्यादृष्टीनं राज्यभरातील या यशोगाथा एकत्र करून त्यांचं प्रसारण स्पर्धेच्या निमित्तानं जमणाऱ्या हजारो शेतकऱ्यांपुढं आज होतंय.
मिळून सारे जागर करूया पाण्याचा...
'टॉप ब्रीड' स्पर्धेच्या उद्घाटनाचं औचित्य साधून आज सायंकाळी नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते 'जागर पाण्याचा' या उपक्रमाचा आणि स्पर्धेचा शुभारंभ होतोय. यानिमित्तानं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांचं 'दुष्काळ आणि पाण्याचं नियोजन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या समाजोपयोगी कार्यक्रमाला इथूनच चांगलं पाठबळ मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. चला तर मग... मिळून सारे सामील होऊ या, 'टॉप ब्रीड' स्पर्धेमध्ये! त्याचबरोबर जागरही घालूया पाण्याचा!!
Comments
- No comments found