स्पर्धा कशासाठी?
भारत हा कृषिप्रधान देश असून त्यात आपला महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळं अन्नदाता असणारी कृषिसंस्कृती आपल्या मातीत भरून पावलीय. इथले सगळे सणवार हे शेतीशी साधर्म्य सांगणारे. इथं दिवाळीही होते आणि बैलपोळाही तेवढ्याच धूमधडाक्यात साजरा होतो. इथलं अवघं जगणं असं कृषिसंस्कृतीला व्यापून राहिलंय. एक काळ होता. घरात पैलवान अन् दारात जातिवंत बैलजोडी असली की ती शेतकऱ्याची शान समजली जायची. आपल्या राज्यात विविध भौगोलिक परिस्थितीत, हवामानात टिकलेल्या, रुळलेल्या जातिवंत जनावरांच्या या प्रजाती म्हणजे आपला दुर्मिळ ठेवा आहे. थोडक्यात काय, तर गुरंढोरं हे आपलं धन, पशुधन. हल्लीच्या संकरीत जमान्यात आपण हा ठेवा जपायला हवा, वाढवायला हवा, या उदात्त हेतूनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. 29 आणि 30 मार्च असे दोन दिवस या स्पर्धा होणार असून त्यासाठी शेतकरी प्रामुख्यानं डांगी आणि खिल्लारं जातीचे आपले जातिवंत बैल घेऊन उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेमागचा सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस, इगतपुरी यांनी सहकार्याचा हात पुढे केला असून त्यांच्या संयुक्त विद्ममानं या स्पर्धा पार पडतायत.
घोटीच का?
रामाची भूमी असलेल्या नाशिकजवळचं घोटी राज्यभरात प्रसिद्ध आहे ते इथं भरणाऱ्या जनावरांच्या बाजारामुळं. त्यामुळं घोटी माहीत नाही, असा शेतकरी विरळाच. विशेष म्हणजे, स्थानिक डांगीपासून ते खिल्लारसारखी जातिवंत खोंडं इथं बाजारात आवर्जून दिसतात. करोडो रुपयांची उलाढाल होणारा हा बाजार सध्याच्या इंटरनेटच्या युगातही भरून पावतोय. त्यामुळं या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी घोटीजवळचं खंबाळे निवडलंय. त्यानंतर सपूर्ण राज्यभरात टप्प्याटप्प्यानं या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
काय आहे टॉप ब्रीड?
'टॉप ब्रीड' स्पर्धा म्हणजे काही शंकरपट अथवा बैलगाड्यांची शर्यत नव्हे. तर बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी जसे बैलांना सजवून-धजवून गावातून मिरवतात, त्याचप्रमाणे या स्पर्धेत राज्यभरातून आलेले बैल मांडवात मिरवत येतील. पशुतज्ज्ञ आणि परीक्षक या बैलांची योग्य पारख करतील. त्यांच्या खुरापासून ते दातापर्यंत आणि वशिंडापासून शेपटीच्या लांबीपर्यंत सर्व गोष्टींची पारख करून त्यातूनच 'टॉप ब्रीड' निवडलं जाणार आहे. सोनार जसा सोन्याचा कस लावतो, अगदी तसाच कस लावून जातिवंत बेणं कोणतं ते ठरवलं जाईल. यातील सुदृढ, सुलक्षणी बैलांना पारितोषिकं दिली जातील. त्यांच्या मालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे सव्वालाखांची रोख बक्षिसं दिली जातील. या बक्षिसांतील तपशील पुढीलप्रमाणे :-
टॉप ब्रीड – डांगी आणि खिलार या जातीसाठी प्रत्येकी बक्षिसं - रु. 11 हजार 111, ढाल आणि प्रशस्तिपत्र
पहिला क्रमांक – रु. 5 हजार 555, ढाल आणि प्रशस्तिपत्र
दुसरा क्रमांक - रु. 3 हजार 333, ढाल आणि प्रशस्तिपत्र
तिसरा क्रमांक – रु. 1 हजार 111, ढाल आणि प्रशस्तिपत्र
या माध्यमातून आपल्याकडच्या सुदृढ जित्राबांचा शेतकऱ्यांना अभिमान वाटेल. महाराष्ट्रातील जातिवंत जनावरांची जपणूक होईल, त्याचप्रमाणं ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आपल्या तुकोबांनी सांगितल्याप्रमाणं 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' याप्रमाणं हे 'टॉप ब्रीड' पुढं चौखूर उधळावं आणि मराठी माती समृद्ध व्हावी, यासाठीच हा घाट घातलाय.
स्पर्धेत होणार 'जागर पाण्याचा'!
या स्पर्धेसाठी सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी आपल्या उमद्या बैलांसह सहभागी होतील, असा अंदाज आहे. या शेतकऱ्यांना जित्राबांबरोबरच पाण्याचा जागर घालण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच, 'भारत4इंडिया'नं 'जागर पाण्याचा' या विशेष उपक्रमात पाणी राखून दुष्काळाला यशस्वी तोंड देणाऱ्या राज्यभरातील झुंजार शेतकऱ्यांच्या यशोगाथा जनतेपुढं ठेवल्यात. त्या एकत्रितपणं पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 29 तारखेला संध्याकाळी नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते 'जागर पाण्याचा' या उपक्रमाचा आणि स्पर्धेचा शुभारंभ होईल. यावेळी उपस्थितांना 'जागर पाण्याचा' हा व्हिडिओपट दाखवण्यात येईल. यानिमित्तानं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांचं 'दुष्काळ आणि पाण्याचं नियोजन' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
'जागर पाण्याचा' मागील उद्देश
राज्याच्या अनेक भागांत सध्या दुष्काळाचे चटके बसत आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नानाविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामुळं दुष्काळग्रस्त जनतेला आधार मिळतो आहेच, पण आम्हाला असं वाटतं की, या मदतीच्या जोडीला त्यांना हवी आहे, परिस्थितीशी झगडण्यासाठीची मानसिक उभारी. दुष्काळाशी झुंजणारी, पाणी जपणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेतच. त्यांची ही धडपड आम्ही कॅमेऱ्यात टिपून त्यांच्या यशोगाथा 'भारत4इंडिया.कॉम' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केल्या आहेत, आणि त्या मालिकेला नाव दिलंय, 'जागर पाण्याचा'!
यात आहेत दुष्काळातही पाणी जपून परिसर हिरवागार ठेवणारी राज्यभरातली माणसं, त्यांची गावं, संस्था यांच्या यशोगाथा. दुष्काळग्रस्त भागातील लोकांसमोर या यशोगाथा याव्यात, त्यातून त्यांनी ऊर्जा, उभारी, प्रेरणा घ्यावी, असा आमचा उद्देश आहे. या व्हिडिओ कथा एका फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून गावोगावी, अगदी चारा छावण्यांमधूनही दाखवाव्यात, असाही आमचा मानस आहे.
त्याला इथूनंच चांगलं पाठबळ मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. चला तर मग...मिळून सारे सामील होऊ या, 'टॉप ब्रीड' स्पर्धेमध्ये! त्याचबरोबर जागरही घालूया पाण्याचा!!