जागर पाण्याचा

सौरऊर्जेनं आलं आदिवासींच्या दारी पाणी

प्रवीण मनोहर, अमरावती
मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं सौरऊर्जेची मात्रा लागू केलीय. यामुळं जवळपास पन्नासहून अधिक पाड्यांना नळानं शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. दारात पाणी आल्यानं आदिवासींच्या जगण्याचे संदर्भच बदलले असून, महिलांना मुलाबाळांकडं लक्ष द्यायला वेळ मिळतोय.
 

मेळघाट...
रस्ते नाहीत म्हणून चांगली आरोग्य सेवा नाही. चांगलं शिक्षण नाही. उद्योगधंदे नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, पाणीही नाही. त्यामुळं मेळघाटातील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगररांगांमध्ये भटकंती करावी लागते. त्यातून जे पाणी मिळतं ते शुद्ध असतंच असं नाही. पाण्यानं जीव कातावल्यानं त्यांना मुलाबाळांकडं पाहिजे तेवढं लक्ष देता येत नाही. त्यात मिळेल त्या अशुद्ध पाण्यावर गुजराण करावी लागते. त्यातूनच मग आजारपण डोकं वर काढतं. कुपोषणासारखा प्रश्न भेडसावतो. मेळघाटातील जवळपास पन्नास खेड्यांची ही दशा. मात्र, वीज नसल्यानं प्रशासन हतबल होतं. विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा वापर होत नव्हता. त्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेनं कंबर कसली आणि वीज पाड्यांवर पोहोचली.


Melghat Intro Imageसौरऊर्जेनं उजळली आदिवासी गावं

चिखलदरा तालुक्यातील माखला गावातलं चित्रच या सौरऊर्जेमुळं बदललंय. या पाड्यावर सौरऊर्जेवर आधारित पाणीपुरवठ्याची योजना आली तेव्हापासून अवघ्या आदिवासींमध्ये आनंदीआनंद आहे, असं सरपंच सांगतात. इथल्या आदिवासी महिलांना फक्त कोरकूच भाषा येते. पाण्यामुळं भटकंती कायमची बंद झाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नाही. त्यांच्याशी बोलताना ते लख्खपणं जाणवतं. सौरऊर्जेमुळं त्यांना निरंतर पाणीपुरवठा होतोय.

अशी साकारली योजना...
आदिवासी पाड्यांवर ही योजना साकारताना प्रशासनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं.
अमरावती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सर्व आव्हानांचा मुकाबला करून ही योजना प्रत्यक्षात आणली. आपण काहीतरी केलं, याचा मोठा आनंद असल्याची भावना त्यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केली. आदिवासी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, एवढ्यावरच हा प्रश्न मर्यादित नव्हता तर तो आरोग्याशी संबंधित होता. महिलांना 500मीटर डोंगर उतरून पाणी भरावं लागायचं. त्यामुळं वाढत्या वयात ही खटपट करावी लागल्यानं उंची खुंटत होती. डोक्यावरचे केस गळत होते. काही महिलांना तर टक्कलही पडलं होतं. त्यामुळं उंचावर असलेल्या गावांत 500 मीटर खोल विहिरीतून 500 मीटर उंचीवर थोडंथोडकं नव्हे तर 50 हजार लिटर पाणी लिफ्ट करून टाकीत भरणं हे आव्हान होतं. मात्र प्रशासनानं ते लीलया पेललं.

पाण्यानं जगण्याचे संदर्भ बदलले
या योजनेमुळं दारी पाणी आलं आणि आदिवासींच्या जगण्याचे अनेक संदर्भ बदलून गेले. आदिवासी नियमित पाणीपट्टी भरत असल्यानं त्यापोटी माखला ग्रामपंचायतीला वर्षाला 50हजार रुपये उत्पन्न मिळतं, असं ग्रामसेवक प्रमोद म्हळसने सांगतात. मोती दारशिंबे ही महिला सांगते, ''आधी प्यायला पाणी नव्हतं. मात्र, आता आम्ही परसबाग फुलवलीय. वांगी, टॉमेटो, मिरची, कोथिंबीर आता घरीच उगवतो. मुलांच्या आहारात जीवनसत्त्वं मिळायला लागलीत. गावात सहा वर्षांखालील 96 बालकं आहेत. आठ-दहा महिन्यांपूर्वी गावात कुपोषणाच्या तिसऱ्या श्रेणीत चार बालकं होती. आता फक्त दोनच आहेत. पाणी दारी आल्यानं तेही लवकरच या श्रेणीतून बाहेर पडतील. लहान मुलांना आता पूर्वीसारखे पोटाचे विकार होत नाहीत.''

मेळघाटातील कुपोषणाच्या धाग्याचा गुंता हा तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये आहे. जर या पायाभूत सुविधा सुटल्या तर कुपोषण आपोआप कमी होईल. या प्रक्रियेत सौरऊर्जा महत्त्वाची ठरणार आहे, हेच यातून स्पष्ट होतं. 

Comments (6)

  • In the year 1999 16 schemes were sanctioned for Melghat using solar energy. These were completed by the year 2000. People enjoyed the water supply at their doors. Otherwise they had to go down by about 70 m and carry water up the hill. They saved the time and helped improve the health.

  • छान…योजना सगळ्याच छान असतात . योजनेचे पैसे खर्च करायचे असतात म्हणून तो खर्च होतो . त्याचा फायदा किती काळ लोकांना होतो हे बघणे गरजेचे आहे. एकदा बिघडल्यावर त्याकडे कोणीही लक्ष देत नाही . अश्या अनेक योजना सुरवातीला काही काळ ठीक चालतात. नंतर त्याचा बट्ट्याबोळ होतो . अधिकारी बदलले कि नवीन योजना राबविण्याचा बेत आखतात. जुन्या योजनांकडे पूर्णपणे कानाडोळा केला जातो. बिघडलेले हातपंप आणि सौर पंप लागलीच दुरुस्त झाले तरच विकास होईल त्या गावचा. गडचिरोली - मेळघाट आणि अश्या अनेक आदिवासी भागांमध्ये या योजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी आणि मिडीयाने या कडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

  • अतिशय सुंदर अशी प्रोसाहानात्मक बातमी!

  • खुप चांगली यश कथा आहे.प्रशासन व् ग्रामस्थ यांच्यात असाच समन्वय व् सहभाग असला तर एकही वाडी वस्ति pannyavachun राहणार नाही=    या धोरनामुले adivasi

  • हे काही पहिल्यांदाच घडत नाही. चिखलदरा तालुक्यातच रुईपठार गावात २००८ पासून सोलर वीजेवर पाण्याची सोया केलेली आहे. आजपर्यंत एक दिवसही पानी बंद नाही. लोकांनी ग्रामकोष तयार करून ८०,००० रुपये जमा केले आहेत. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हां प्रकल्प उभा राहीला आहे. लोकांनी आर्थिक योगदानाही दिले आहे. याच सिस्टिमवर वीजेचीही सोय केली आहे.

Load More

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.