जागर पाण्याचा

मल्चिंगनं मिळाली मोसंबीला संजीवनी

विवेक राजूरकर, औरंगाबाद
मराठवाड्यात पसरलेल्या दुष्काळाची झळ आता राज्यभरात चांगलीच जाणवायला लागलीय. दुष्काळामुळं मोसंबीचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आली. पण जिद्द असेल तर काय होऊ शकतं हे औरंगाबादच्या पैठणमधील एका शेतकऱ्यानं आपल्या उदाहरणानं दाखवून दिलंय.
 Mulching photoदुष्काळात मल्चिंग ठरलं वरदान

एकीकडं मोसंबीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुलाप्रमाणं जोपासना केलेल्या बागा पाण्याअभावी पिवळ्या पडलेल्या पाहून त्यांच्या डोळ्यातील अश्रू ठरत नाहीयेत. पण या हताश झालेल्या शेतकऱ्यांना पैठण तालुक्यातील एका बळीराजानं अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपली फळबाग बाग हिरवी कशी ठेवायची याचा दाखलाच दिलाय. देवगाव, आडूळ परिसरातील जयजवान जयकिसान या ग्रुपमधील प्रगतशील शेतकरी दीपक जोशी यांनी आपल्या फळबागा जगवण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. या विज्ञान केंद्रातील शेतीतज्ज्ञांनी जोशी यांना आधुनिक मल्चिंग पध्दतीचा वापर करून बागा वाचवण्याचं तंत्र शिकवलं. त्यांनी या पध्दतीचा वापर आपल्या बागेत केल्यावर माना टाकलेल्या पिवळ्या बागा हिरवा रंग लेवू लागल्या.

 

मल्चिंग म्हणजे काय?
दुष्काळात शेतातील उभं पीक वाचवून उत्पादन घेणं म्हणजे तारेवरची कसरतच असते. यात सतत वाढणाऱ्या तपमानामुळं आणि घटलेल्या आर्द्रतेमुळं पिकांची वाढ खुंटते. परिणामी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. यासाठी या मल्चिंग पध्दतीत ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. थेट झाडांच्या मुळांजवळच पाणी देऊन झाडांची पाण्याची गरज भागवली जाते. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानांमधून होणार्‍या उत्सर्जनामुळं झपाट्यानं कमी होतं. यामुळं या दोन्ही क्रिया थांबवण्यासाठी आच्छादनाचा वापर करणं हा मूळ उद्देश असतो. यालाच 'मल्चिंग' असं म्हणतात.

 

मल्चिंग तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचन
जमिनीतील ओलावा राखण्यासाठी, तसंच जमिनीचं तपमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. या अच्छादनासाठी ३० मायक्रॉनचं पॉलिथीन वापरलं जातं. झाडाच्या बुंध्याशी जिथं ठिबकद्वारे पाणी पडतं त्या ठिकाणी खड्डा करून तिथं शेणखताबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली पॉलिमर पावडर मिसळली जाते. या आच्छादनासाठी उसाचं पाचट, वाळलेलं गवत, पालापाचोळा, लाकडी भुसा, भाताचं काड यांचाही वापर केला जाऊ शकतो. कृषी विद्यापीठानं यासाठी ८० ते १०० मायक्रॉन जाडीचं पॉलिथिन वापरायचा सल्ला दिलाय.

 

पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत
या मल्चिंग पध्दतीमुळं पाण्याची ३० ते ३५ टक्के बचत होऊन पाण्याची पाळी ४ ते ५ दिवस लांबवता येते. तसंच या पध्दतीत पानांमधून होणारं पाण्याचं उत्सर्जन रोखण्यासाठी झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडून झाडाचा घेरसुद्धा कमी केला जातो. तसंच ६ ते ८ टक्के केओलिन या बाष्परोधकाची ६०० ते ८०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मात्रा घेऊन झाडांवर फवारणी केली जाते. ही फवारणी दर १५ दिवसांच्या अंतरानं दोन वेळा करावी लागते. यामुळं पानांद्वारे होणारं उत्सर्जन २५ ते ३० टक्के कमी होऊन जमिनीतील ओलावा बराच टिकतो. हा काळ फळबागेस अत्यंत फायदेशीर असतो. तसंच खोडाच्या सालीला उन्हाचा तडाखा बसू नये, खोडांवर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बोर्डोपेस्टचं मिश्रण लावलं जातं.

 

मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पैठण येथील जयजवान जयकिसान गटातील ६० ते ७० शेतकऱ्यांनी १०० हेक्टर परिसरातील आपल्या बागा हिरव्यागार करण्यात यश मिळवलं आहे. जयजवान जयकिसानचा हा प्रयत्न नक्कीच मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे हे नक्की.


संपर्क - दीपक जोशी, मोबाईल – 7588931913

Comments (3)

  • जय जवान जय किसान

  • मी मल्चिंग तंत्रज्ञान व्हिडिओ पाहिला. मीपण माझ्या मोसंबीकरिता हे तंत्रज्ञान वापरणार आहे

  • अतिशय समर्पक स्टोरी आहे. दुष्काळावर उपयुक्त आहे. याच संदर्भातील माहिती महिनाभरापूर्वी साप्ताहिक आधुनिक किसानमध्येही वाचली होती. दीपक जोशी आणि त्याच्या सहकाऱ्याचं अभिनंदन...

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.