जागर पाण्याचा

सरकारी अधिकाऱ्यांनी साकारली टाकं

अविनाश पवार, पुणे
शिवनेरी गडावरील टाक्यांना पाणी आहे, तर जवळच सह्याद्रीच्या रांगेत राहणाऱ्या आदिवासींची पाण्यासाठी परवड का, या प्रश्नाचा ध्यास तहसीलदारांनी घेतला. राबून प्रामाणिकपणं काम केलं. त्यांनी कातळात खोदलेली 10 टाकं आज पाण्यानं भरल्यानं इथल्या आदिवासींचं जीवनही भरून पावलंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर खडकालासुद्धा पाझर फुटून पाणी उपलब्ध होऊ शकतं, याचं हे उदाहरण.

शिवनेरीवरील टाक्यानं दिली प्रेरणा

आज राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावतेय. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातल्या आदिवासी बांधवांच्या नशिबीसुद्धा वर्षानुवर्षं दुष्काळ होताच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा हा पश्चिम भाग सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्येच येतो.  इथं पावसाळ्यात धो-धो पाऊस आणि उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही, अशी कायमचीच परिस्थिती. त्यामुळं जुन्नर तहसीलदार दरवर्षीच या भागात पाण्याचे टँकर कसे पोहोचवता येतील, या विवंचनेत असायचे. मागील दोन वर्षांपूर्वी तर पाण्याच्या टँकरचा अरुंद घाट रस्त्यांमुळे अपघात होऊन त्यात चालकाचा मृत्यू झाला. या घटनेनं जुन्नरचे सध्याचे तहसीलदार दिगंबर रौंधळ व्यथित झाले.  या आदिवासी भागाला निसर्गानं भरभरून दिलंय. मात्र, निसर्गाशी खऱ्या अर्थानं एकरूप होऊन जगणाऱ्या आदिवासींच्या नशिबी पाण्यासाठी येणारी भटकंतीची वेळ त्यांना अस्वस्थ करू लागली. जवळच असणाऱ्या शिवनेरी गडावरील पाण्याचं टाकं वर्षभर भरलेलं असतं. अशाच पद्धतीचं टाकं जर या भागात झालं तर यातून पावसाचं पाणी साठवता येईल. शिवाय जिथं नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत, तेही पाणी उपलब्धतेसाठी उपयुक्त ठरतील, याची माहिती झाल्यावर रौंधळ यांनी यावर काम करायचं ठरवलं.

 

दहा टाकी साकारली

जुन्नर तालुक्यातच पानंद रस्त्याच्या विकासासाठी टाटा कंपनीनं यंत्रसामग्रीची मदत केली होती. ते लक्षात घेऊन त्यांनी कंपनीच्या सामाजिक विभागाला या कामासाठी मदत करण्याची पुन्हा विनंती केली. त्यात त्यांना प्रांत सुनील थोरवे यांची मोलाची साथ मिळाली. या आदिवासी दुर्गम विभागात काम करणं अतिशय कठीण काम होतं. मात्र, या आदिवासी महिलांचं अर्धंअधिक जीवन पाणी वाहण्यात चालल्याचं वास्तव कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांनी या कामासाठी तब्बल १५ लाख रुपये दिले. त्यानंतर मनोबल उंचावलेल्या तहसीलदार रौंधाळ यांनी या भागाचा दौरा करून कुठं कुठं टाकं घेता येऊ शकतं, याची पाहणी केली. काही ठिकाणी नैसर्गिक टाक्यांनी पुनर्जीवित केलं. काही ठिकाणी कातळ होता. तिथल्या जमीन मालकाकडून त्या जागेचं बक्षीसपत्र करून घेतलं आणि टाकीचे घाव घालून टाकं साकारलं. अशी सुमारे 10 टाकी या भागात साकारलीत. ती आता पाण्यानं भरून गेल्यानं पाणीटंचाईवर मात झालीय. त्याचा आनंद इथल्या महिलांच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट दिसतो.

 

पाण्यासाठीची वणवण संपली

अंबी, हातवीज, सुकाळवेढे, दुर्गेवाडी अशा या दुर्गम गावांच्या परिसरात १० टाकं झालीत. त्यामुळं आम्हाला पिण्याचं पाणी मिळतंय. त्यामुळं आमची पाण्याची वणवण कायमची मिटलीय, असं  हातवीज येथील कमल डेंगळे यांनी सांगितलं.

 

यशस्वी मॉडेल

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात झालेला हा प्रयोग राज्याला दिशादर्शक आहे. आपल्या आसपासचे नैसर्गिक स्रोत असोत अथवा गावतळी,  त्यांचा पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणासाठी वापर केला तर बऱ्याच अंशी गावातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो, हेच या उदाहरणावरून स्पष्ट होतं. यशस्वी मॉडेल म्हणून याकडं पाहून त्याची राज्यभरात अमलबजावणी झाल्यास दुर्गम भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास जुन्नरचे प्रांताधिकारी सुनील थोरवे यांनी व्यक्त केला.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.