
स्वातंत्र्याच्याही आधीपासूनची ही शाळा आहे. या गावात खरी पहाट उगवली, ती नव्वदच्या दशकानंतर... पोपटराव पवारांनी हे गाव सुधारलं, एकी साधली, गावात योजना आणून विकासाची कास धरली आणि मग लक्ष केंद्रित केलं गुणात्मक आणि मूल्यवान शालेय शिक्षणावर. बरं, मनात आणलं असतं, तर इथं खासगी शाळाही काढता आली असती. पण त्यांची पाळमुळं झेडपीच्या शाळेत रुजलेली, त्यामुळं शाळा घडवायची ती हीच, हाच गावकऱ्यांचाही ध्यास. मग गावात त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास घडवला. आता शाळाही जलसाक्षर करू, स्वयंपूर्ण करू, असा सगळ्यांनाच विश्वास होता.
मग शाळेसाठी लागणाऱ्या पाण्याचंही नियोजन केलं. तेही असं की, काहीतरी बोजड तंत्रज्ञान न वापरता, अगदी हसत-खेळत मुलांना मौज वाटेल अशाच पद्धतीनं. आज शाळेला लागणारं सगळं पाणी आवारातच उपलब्ध आहे. बागबगीचा, स्वच्छतागृहं, वनौषधी उद्यानं आणि अगदी गरज पडली तर गावासाठीही पाणीपुरवठा करण्याची तयारी आहे.
पाणी म्हणजे जीवन हे कधी काळी दुष्काळाचे चटके सोसलेल्या या गावानं जाणलंय. त्यामुळंच जलसाक्षरतेचा धडा नवीन पिढीला देऊन त्यांची टंचाईतून कायमची मुक्ती करण्यासाठी ते धडपडताहेत. झेडपीच्या शाळेतली ही जलसाक्षरता हे त्याचं पहिलं पाऊल आहे.
Comments (1)
-
नमस्ते. पवारसाहेब माझं गावदेखील नगरमध्ये असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. कृपया आपण मार्गदर्शन करावं. तुमचं खूप खूप अभिनंदन . मदतीच्या अपेक्षेत...